रत्नागिरी

रत्नागिरीत घरफोडी;  सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास!

रत्नागिरी दि. १८ :- तालुक्यातील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४,०८,१९२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी ओंकार रामचंद्र पाडावे (वय ३२, रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १६ मे २०२६ रोजी रात्री २०.०० ते दिनांक १७ मे २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी यांचे घर बंद असल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा अर्धवट मोडून आतील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड चोरून नेली.

चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने खालील मुद्देमाल चोरला असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये –

रोख रक्कम: ५०,०००/- रुपये (५०० रुपयांच्या एकूण १०० नोटा)

सोन्याचे मंगळसूत्र: २,४०,०००/- रुपये किमतीचे (वजन ४ तोळे ८ ग्रॅम)

सोन्याची चैन: ३४,३६५/- रुपये किमतीची (वजन ६ ग्रॅम ६७० मिली)

सोन्याची अंगठी: २५,०००/- रुपये किमतीची (वजन ५ ग्रॅम)

सोन्याचे कानातले टॉप्स: एकूण ३५,०००/- रुपये किमतीचे (३ ग्रॅम आणि ४ ग्रॅम वजनाचे दोन जोड)

सोन्याचे कानवेली: १०,०००/- रुपये किमतीचे (वजन २ ग्रॅम)

सोन्याची बेबी रिंग: १०,८२७/- रुपये किमतीची (वजन १ ग्रॅम ०.३० मिली)

सोन्याची नथ: ३,०००/- रुपये किमतीची (वजन ७०० मिली)

या घरफोडीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम ३०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button