रत्नागिरीत पाच दिवसीय ‘पुरातत्त्वशास्त्र अभ्यासवर्ग’ उत्साहात संपन्न

रत्नागिरी दि. १४ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय अंतर्गत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय ‘पुरातत्त्वशास्त्र अभ्यासवर्ग’ उत्साहात संपन्न झाला. या अभ्यासवर्गात प्रागैतिहासिक कालखंडापासून कोंकणातील पुरातत्त्वीय वारशापर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्गाचे उद्घाटन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासातून भारतीय संस्कृतीचे मूळ स्वरूप समजून घेण्यास मदत होते, असे सांगत विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित अध्ययन करावे, असे आवाहन केले.
पाच दिवस चाललेल्या या अभ्यासवर्गात विविध विषयांचा समावेश करण्यात आला. पहिल्या दिवशी तार्किक खातू यांनी प्रागैतिहासिक कालखंड, मानवी उत्क्रांती आणि अश्मयुगीन टप्प्यांचे विवेचन केले. दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या म्हस्के यांनी ताम्रपाषाण युग आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. तिसऱ्या दिवशी डॉ. योगेश प्रभुदेसाई यांनी मंदिर स्थापत्य व मूर्तीकला याविषयी मार्गदर्शन करत नागर, द्राविड, वेसर तसेच भूमिज स्थापत्यशैलींचा उहापोह केला. चौथ्या दिवशी प्रसन्न खानविलकर यांनी नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या यांचे महत्त्व स्पष्ट केले, तर पाचव्या दिवशी ऋत्विज आपटे यांनी कोंकणातील पुरातत्त्वीय वारसा, कातळशिल्पे व वारसा संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. अभ्यासवर्गामुळे इतिहास व पुरातत्त्वशास्त्र विषयाबाबतची समज अधिक सखोल झाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.
समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण डॉ. दिनकर मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्वरूप काणे यांनी केले, तर कश्मिरा दळी व ऋत्विज आपटे यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. समारोपपर भाषणात भविष्यातही अशा प्रकारचे संशोधनाभिमुख अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतील, असे संचालकांनी सांगितले. उपस्थितांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून असे उपयुक्त उपक्रम वारंवार आयोजित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


