क्रीडारत्नागिरी

‘कुंभार्ली घाटाचा राजा २०२६’ ईश्वर पाटील तर ‘कुंभार्ली घाटाची राणी २०२६’ श्रावणी परिट

‘किंग ऑफ कुंभार्ली २०२६ स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण दि. ६ : सह्याद्रीच्या कुशीत रंगलेल्या अत्यंत रोमहर्षक आणि चित्तथरारक, प्रतिष्ठेच्या आव्हानात्मक ‘किंग ऑफ कुंभार्ली २०२६ या चिपळूण सायकलिंग क्लब आयोजित राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत यंदा जवळपास ४०० स्पर्धक देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झाले होते. या वर्षीच्या पर्वात पुरुषांमध्ये ईश्वर पाटील याने दमदार कामगिरी करत ‘कुंभार्ली घाटाचा राजा’ हा मानाचा किताब पटकावला.

अटीतटीच्या या स्पर्धेत अवघ्या 01:01:13 या आजपर्यंतच्या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत त्याने या स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. तर महिलांमध्ये पुण्याची श्रावणी परिट हिने 1:26:34 या वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत ‘कुंभार्ली घाटाची राणी’ हा किताब पटकावला. यंदाही प्रत्येक गटात तुफान चुरस पाहायला मिळाली. अवघ्या काही मिलीसेकंदांच्या फरकाने क्रमांकांमध्ये बदल दिसून आले. सकाळी सहा वाजता सावरकर मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथून साहिल डेव्हलपर्स चिपळूणचे श्री. सचिन कदम तसेच रत्नागिरी ट्रायथलीट क्लबचे संस्थापक श्री. अमित कवितके यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून सुरू झालेली ही स्पर्धा कुंभार्ली घाट माथ्यावर संपवून, स्पर्धकांनी चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये पारितोषिक वितरण समारंभासाठी हजेरी लावली. आ. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनिरुद्ध निकम, जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, मंगेश पेढांबकर या मान्यवरांच्या हस्ते तर प्रमुख देणगीदार सचिन कदम, विनती ऑरगॅनिक्सचे प्रतिनिधी सुमेर तारे, कृष्णा केमिकल्सचे प्रतिनिधी सुयोग चव्हाण, सारस्वत बँकेचे प्रतिनिधी कल्पेश महाडीक व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

चिपळूण सायकलिंग क्लबच्या प्रत्येक उपक्रमासोबतच या स्पर्धेसाठी देखील हरसंभव मदत करणारे आ. शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात सर्व सहभागी स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले. सोबत अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेली आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालेल्या या स्पर्धेच्या नेटक्या आयोजनाबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब आणि उत्स्फूर्त स्वयंसेवकांची मनस्वी प्रशंसा करीत, स्थानिक नेते आणि उद्योगांना या स्पर्धेसाठी आणखी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. तसेच देशभरातील उत्साही स्पर्धकांना दरवर्षी वाढत्या सोयी आणि सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.

किंग ऑफ कुंभार्ली 2026, आवृत्ती पाचवी, स्पर्धेचा गटनिहाय निकाल खालील प्रमाणे : महिला मास्टर (३६ वर्षांवरील). प्रथम : अंजली भलिंगे (पुणे). द्वितीय : रुपाली गिरमकर (पिंपरी पुणे). तृतीय : ब्लांशे थेमुडो (गोवा). महिला एलिट (१६ ते ३५ वर्षे). प्रथम : श्रावणी कृष्णात परिट (पुणे). द्वितीय : योगेश्वरी महादेव कदम (सांगली). तृतीय : श्रावणी उमेश घोडेस्वार (कोल्हापूर). पुरुष किड्स (१० ते १७ वर्षे). प्रथम : आर्यन सुनील मालगे (कोल्हापूर). द्वितीय : आर्यन संदीप जाधव (पलूस). तृतीय : साईराज तुषार भोईते (सातारा). पुरुष ज्येष्ठ (५१ वर्षांवरील). प्रथम : महेश किणी (ठाणे). द्वितीय : प्रशांत तिडके (पुणे). तृतीय : संतोष पवार (पुणे). पुरुष मास्टर (३५ ते ५० वर्षे). प्रथम : अनुप पवार (मुंबई). द्वितीय : संजीव कुमार शर्मा (दिल्ली). तृतीय : श्रधीर सागर शिरझेम (नोएडा). पुरुष खुला गट (१८ ते ३५ वर्षे). प्रथम : ईश्वर पाटील (धाराशिव). द्वितीय : निहाल नदाफ (सांगली). तृतीय : सिद्धेश पाटील (कोल्हापूर). विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे चिपळूण सायकलिंग क्लबकडून अभिनंदन करण्यात आले. स्पर्धकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसादामुळे क्लबचे सदस्य आणि चिपळूणमधील स्वयंप्रेरणेने सहभागी झालेले स्वयंसेवक यांनी भविष्यातील उपक्रमांच्या आयोजनासाठी हुरूप आल्याचे मत व्यक्त केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पोफळी वीज मंडळाचे सिक्युरिटी गार्ड्स आणि ऑफिसर्स, तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व त्यांचे कंत्राटदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी क्लबतर्फे चार वैद्यकीय पथकं तयार ठेवण्यात आली होती. यासाठी अवनीश हॉस्पिटल, अपरान्त हॉस्पिटल, वालावलकर हॉस्पिटल व परशुराम हॉस्पिटल यांनी सुसज्ज व अद्ययावत रुग्णवाहिका पुरविल्या होत्या. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती चिंचघरी हायस्कूलमधील २५ विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. शिरगाव हायस्कूलच्या मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात सायकलिस्टचा उत्साह वाढवला. स्थानिक पातळीवर श्री.सतीश पोद्दार, डॉ.पाटील, भरत माने, आणि सहकारी यांनी शिरगांव पुलापलिकडे क्लबचा अधिकृत हायड्रेशन पॉईंट सांभाळून आपला खारीचा वाटा उचलला तर श्री भरत लब्धे यांनी शिरगाव तिठ्ठा येथे पाणी वाटपासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच स्थानिक प्रशासन, स्थानिक नेते, स्थानिक उद्योग आणि चिपळूणमधील नागरिकांनी केलेल्या हरसंभव सहकार्याबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या सबळ पाठिंब्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबने मनस्वी कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button