रत्नागिरी

निवे बुद्रुक चोरी प्रकरणाचा छडा; सोन्याचे दागिने लंपास करणारा जावई अटकेत

देवरुख दि. ४ : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील एका घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेचा देवरुख पोलिसांनी यशस्वी तपास लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीप्रकरणी संशयित म्हणुन घरमालकाच्या जावयालाच पोलिसांनी अटक केली असून, त्याने चोरलेले दागिने बँकेत गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी परिसरात राहणारे संतोष दौलत पाल्ये यांच्या घरातून २४ जानेवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत चोरी झाली होती. पाल्ये यांच्या घरातील बंद कपाटात ठेवलेला एक सोन्याचा हार आणि एक सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. कपाटाचे कुलूप उघडून अत्यंत शिताफीने ही चोरी करण्यात आली होती.

आपले दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच संतोष पाल्ये यांनी देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना घरातीलच व्यक्तीवर संशय आला. अधिक चौकशी आणि तांत्रिक तपासाअंती संतोष पाल्ये यांचा जावई संशयित सचिन दत्तात्रय नाखरेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित आरोपी सचिन याने सासरच्या घरातून लंपास केलेले दागिने एका बँकेत गहाण ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. देवरुख पोलिसांनी आरोपी सचिन नाखरेकर याला अटक केली असून, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button