राष्ट्रीय कार्यक्रमात, स्वगणनेत सामील व्हा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
पालकमंत्र्यांच्या स्व-गणनेने जिल्ह्यातील जनगणनेचा आरंभ

रत्नागिरी, दि. १ : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना 2027 चा आरंभ आज पोलीस परेड ग्राऊंड येथे केला. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून रत्नागिरी जिल्हावासियांनी जनगणनेत सामील व्हावे, स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
पोलीस परेड ग्राऊंड येथील ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्री जनगणना सेल्फी पॉईंट येथे येऊन त्यांनी स्वगणना केली. यानंतर त्यांनी जिल्हावासियांना आवाहन केले. ते म्हणाले, मला जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करायच आहे, स्व-गणना आज 1 मे पासून 15 मे पर्यंत पूर्ण देशामध्ये होतेय. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील लोकांनी देखील सामील झालं पाहिजे. केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2011 नंतर ही जनगणना आता पहिल्यांदा होतेय. त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आपण सर्वांनी सामील व्हावं, ही पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते.


