रत्नागिरीसामाजिक

शुभांगी बेलवलकर यांना यमुनाबाई सर्वोदय पुरस्कार प्रदान

रत्नागिरी दि. २७ : श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा यमुनाबाई खेर सर्वोदय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शुभांगी कोलगे–बेलवलकर यांना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. साडी, सन्मानचिन्ह, श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. सर्वोदय छात्रालयातील मोरोपंत जोशी सभागृहात रविवारी कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते, तसेच सोबत ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराचे यंदाचे १७ वे वर्ष होते. प्रास्ताविकात ॲड. संदीप ढवळ यांनी संस्थेची माहिती देत, हा पुरस्कार निवड प्रक्रियेद्वारे दिला जातो, असे सांगितले. तसेच ट्रस्टच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.

याप्रसंगी न्यायाधीश राजेंद्र पाटील म्हणाले की, स्व. बाळासाहेब खेर यांच्या विचारांचा वारसा यमुनाबाई खेर ट्रस्टचे विश्वस्त समर्थपणे पुढे नेत आहेत. समाजातील दुर्बल घटक, विद्यार्थ्यांना ते संधी देत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांनी दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन जागतिक तापमानवाढ, प्लास्टिकचा वाढता वापर यांसारख्या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीचे उपक्रम राबविण्याचेही त्यांनी सुचविले.

सत्काराला उत्तर देताना शुभांगी कोलगे–बेलवलकर यांनी सांगितले की, ट्रस्टचे खूप खूप आभार. अशा मोठ्या सन्मानामुळे माझी सामाजिक जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यांचा मुलगा सिद्धांत बेलवलकर यानेही मनोगत व्यक्त करून आनंद व्यक्त केला.

व्यवस्था समितीचे ॲड. शिवराज जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन वीणा कजरेकर यांनी केले. व्यवस्था समितीच्या उपाध्यक्ष जयश्री बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. मॅनेजिंग ट्रस्टी पांडुरंग पेठे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button