रत्नागिरी

पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघातर्फे मेळाव्याला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी दि. २६ : पटवर्धन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांसह माजी ज्येष्ठ शिक्षक, माजी मुख्याध्यापकही उपस्थित होते. या मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला.

ढोल- ताशांच्या गजरात माजी विद्यार्थी व शिक्षकांचे जंगी स्वागत करण्यात आले. रेड कार्पेटवरून माजी विद्यार्थ्यांना चालत नेऊन, पुष्पवृष्टी करण्यात आली. या अनोख्या स्वागताने माजी विद्यार्थी भारावून गेले. कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघातर्फे सर्व माजी मुख्याध्यापक, शिक्षकांचा रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सत्काराने सर्व शिक्षकवृंद भारावले.

गुरुवर्य अच्युतरावांच्या प्रतिमेला वंदन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी स्वागतगीत सादर झाले. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी शाळेच्या देदिप्यमान इतिहासाची माहिती सांगितली. शाळेची माजी विद्यार्थिनी ते पहिली महिला मुख्याध्यापिका होण्याचा मान मिळाल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी अध्यक्ष तथा कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी, तसेच भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, डॉ. चंद्रशेखर केळकर, विनायक हातखंबकर, हरी करमरकर, दिवाकर लिमये, राजेंद्र कांबळे, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, शीतल काळे, नित्यानंद भुते, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, संस्थेचे कार्यवाह तथा माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनेश रायकर, कोषाध्यक्ष गौरांग आगाशे उपस्थित होते.

शासनाच्या आदेशानुसार शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे, याद्वारे शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी केले.

कार्याध्यक्ष श्रीराम भावे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शाळेला मोठा इतिहास असून शाळेसाठी गेल्या काही वर्षांत नवीन इमारती बांधण्यात आल्या असून सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर आहे. आधुनिक युगाला आवश्यक विद्यार्थी घडवण्याचे काम शाळा करत आहे. माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सदस्यांनी शाळेला नेहमी सहकार्य करावे.

याप्रसंगी एस. एस. जोशी, दिवाकर लिमये, विनायक हातखंबकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जयेश गुरव यांनी केले. मान्यवरांचा परिचय हेमलता गुरव यांनी करून दिला. गौरांग आगाशे यांनी आभार मानले. त्यानंतर राज्य बालनाट्य स्पर्धेतील हायस्कूलच्या धोंड या एकांकिकेचे सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमाने माजी विद्यार्थी मेळाव्याची शोभा वाढली.

शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव

माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष धनेश रायकर यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार पटवर्धन हायस्कूलने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्यांना संपर्कासाठी चॅटबॉट सुविधा सुरू केली आहे. याद्वारे हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. पटवर्धन हायस्कूलचे १२५ वे वर्ष लवकरच सुरू होणार असून या निमित्त विविध उपक्रम, व्याख्याने, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, बॅचनुसार स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक माजी विद्यार्थ्यांनी 9552091902 या क्रमांकावर संपर्क साधावा. यात जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button