रत्नागिरी

ईश्वराविषयीची भक्ती म्हणजे ज्ञानमार्गाकडे नेणारी पायरी- संपदा निमकर

आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त व्याख्यान

रत्नागिरी दि. २६ : भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेत आद्य शंकराचार्य यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. ईश्वराविषयीची श्रद्धा, प्रेम आणि संपूर्ण समर्पण ही भक्तीची मुख्य तत्त्वे आहेत. भक्तीमुळे मनाची शुद्धी होते आणि त्यातून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अशी पात्रता निर्माण होते. त्यामुळे भक्ती ही केवळ स्वतंत्र साधना नसून, ज्ञानमार्गाकडे नेणारी महत्त्वाची पायरी आहे. अद्वैत वेदांताचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे शंकराचार्य यांनी ज्ञानमार्गाला सर्वोच्च स्थान दिले असले, तरी भक्तिमार्गालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिल्याचे त्यांच्या विचारांतून स्पष्ट होते, आज त्यांच्या भक्तिमार्गावर चालण्याचे कार्य सर्वांनी करावे, असे प्रतिपादन हभप संपदा निमकर यांनी केले.

येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने राणी लक्ष्मीबाई सभागृहात आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त आद्य शंकराचार्यांचा भक्तिमार्ग या विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, डॉ. कल्पना आठल्ये आणि कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि पाठशाळेचे विश्वस्त अनंत आगाशे उपस्थित होते. दोन्ही संस्थांतर्फे हभप निमकर यांचा सत्कार करण्यात आला. संस्कृत पाठशाळेचे ओंकार पाध्ये यांनी स्वागत केले. स्वानंद पठण मंडळाच्या अश्विनी जोशी, स्वरदा जोशी व मानसी सोमण यांनी शंकराचार्यविरचित स्तोत्र सादर केले.

हभप निमकर यांनी सांगितले की, “भज गोविंदम्”सारख्या रचनांमधून त्यांनी सामान्य जनतेला सोप्या भाषेत भक्तीचा संदेश दिला. केवळ शास्त्रज्ञानावर अवलंबून न राहता, ईश्वरभक्तीचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, शिव, विष्णू, देवी, गणेश अशा विविध देवतांवरील स्तोत्रांद्वारे सर्व देवतांमध्ये एकच ब्रह्म आहे, ही अद्वैताची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

वैद्य मंदार भिडे म्हणाले की, संपदाताईंचा अभ्यास चांगला आहे, हे व्याख्यानातून जाणवले. आपण कोण आहोत, याचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. अभ्यास प्रत्येकाला जमला नाही तरी भक्तीमार्ग प्रत्येकाला शक्य आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी सांगितलेल्या या मार्गावरून चालावे.

माधव हिर्लेकर म्हणाले की, आद्य शंकराचार्यांची माहिती लहान वयापासूनच मुलांना अभ्यासक्रमातून कळण्याची आवश्यकता आहे. आज सर्वत्र हिंदू संमेलने होत आहेत. हिंदू धर्माचे अध्वर्यू आद्य शंकराचार्यांची माहिती प्रत्येक हिंदूला असली पाहिजे. गेली काही वर्षे जयंती निमित्त व्याख्यान व सांस्कृतिक उपक्रमांतून प्रचाराचे काम सुरू आहे.

डॉ. कल्पना आठल्ये यांनी सूत्रसंचालन केले. आद्य शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना ज्या हेतूने केली ते कार्य आजही करण्याची आवश्यकता आहे, असे प्रस्तावनेत सांगितले आणि पाहुण्यांचा परिचयही करून दिला. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button