क्षत्रिय मराठा मंडळातर्फे महिलांचा स्नेहमेळावा उत्साहात

रत्नागिरी दि. ५ : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे महिलांचा स्नेहमेळावा नुकताच टीआरपी येथील अंबर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. याला मंडळातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर फनी गेम्स, बॉलीवडू थिम, नृत्याने कार्यक्रम रंगतदार झाला. फनी गेम्समध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आनंद लुटला. कार्यक्रमाचे आकर्षण बॉलीवूड थिममध्ये महिलांनी विविध अभिनेत्रींच्या व्यक्तीरेखा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
उन्नती ब्युटी पार्लरच्या ब्युटीशियन सौ. उन्नती साळवी व व्हीनस सलोनच्या ब्युटीशियन सौ. श्रद्धा आयरे यांचे स्त्रीयांच्या सौंदर्यविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले. सौ. साळवी व सौ. आयरे यांनी पार्लरमध्ये जाऊन त्वचेची तसेच केसांची निगा याविषयी उपचार घेण्याबरोबर काही घरगुती उपचारही सुचवले. तसेच बाह्य सौंदर्याबरोबर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार, योग्य शांत झोप, योग्य आहार याचीही खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे, असे सांगितले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल महिला समिती प्रमुख सौ. श्रेया इंदुलकर यांनी आभार मानले.


