“नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी दि. २९ : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या संयुक्त विद्यमाने “नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” हा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम रत्नागिरी येथील अध्यात्म मंदिर, वरची आळी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात श्री. मिलिंद तेंडुलकर यांनी नर्मदा परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले. त्यांच्या प्रवासातील विविध टप्पे, निसर्गरम्य स्थळे, तसेच परिक्रमेतील आध्यात्मिक आणि मानवी अनुभव यांचे सविस्तर वर्णन त्यांनी केले. या अनुभवांदरम्यान प्रा. सौ. विस्मया कुळकर्णी यांनी संवादात्मक मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाचे छायाचित्रे आणि माहिती दर्शविणारे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले, ज्यामुळे श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव अधिक जिवंतपणे अनुभवता आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. मनीषा रेगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे सचिव श्री. ऋषिकेश पटवर्धन, श्री. विवेक भावे, श्री. निखिल महाराज तसेच सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेश सामंत, सचिव श्री. प्रदीप तेंडुलकर आणि कोषाध्यक्ष सौ. मनीषा रेगे, श्री. सचिन तेंडुलकर, श्री. रमेश साखळकर, श्री. गुरुप्रसाद बोरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने श्री. मिलिंद तेंडुलकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निनाद तेंडुलकर यांनी केले. कार्यक्रमास श्रोत्यांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी नर्मदा परिक्रमेच्या अनुभवातून प्रेरणा घेत कार्यक्रमाचे कौतुक केले.



