हातिवले टोलविरोधात राजापूर तालुका एकवटला; टोल माफीसाठी सर्वपक्षीयांचा इशारा, अन्यथा आंदोलन

राजापूर दि. २७ :- मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा वेगाने सुरू झाल्याने राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. राजापूर तालुक्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हातिवले टोल नाक्यावर निवेदन देण्यात आले.
सकाळपासूनच राजापूर तालुक्याच्या विविध भागातून नागरिक, वाहन चालक, शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी हळूहळू हातिवले येथे जमा होऊ लागले होते. यावेळी उपस्थितांनी मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची शासनामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कोकणवासीयांच्या माथी निकृष्ट दर्जाचा रस्ता मारून आता त्यांच्याकडून टोल वसुली करून पिळवणूक करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत उपस्थितांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे यापूर्वीही हातिवले टोल दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या आंदोलनामुळे व निलेश राणे यांच्या पुढाकाराने टोल वसुली बंद करण्यात आली होती.
दरम्यान पुन्हा टोल सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येत सुरुवातीला निवेदन देऊन आणि गरज पडल्यास आंदोलनाच्या माध्यमातून टोलविरोधात लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
निवेदनात नमूद करण्यात आले की, मुंबई–गोवा महामार्गावरील अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. राजापूर एस.टी. डेपो समोरील महामार्गाचे काम अपूर्ण असून येथे वारंवार अपघात होत आहेत. भू-संपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे मार्ग बंद झाले असून त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. सर्विस रोड, बस स्टॉप, पिकअप शेड यांसारखी कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत वृक्ष लागवड झालेली नाही. मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे.
तसेच महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
हातिवले टोल मार्गावरून राजापूर शहरात नागरिकांना दैनंदिन कामासाठी वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बँका, पोस्ट तसेच बाजारपेठेतील दैनंदिन खरेदीसाठी नागरिकांना दिवसातून अनेक वेळा या मार्गाचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोल माफी देण्यात यावी, अन्यथा सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत निवेदन देण्यात आले. यामुळे हातिवले टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पुढील काही दिवसांत हा विषय आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



