जीजीपीएस शाळेत वार्षिक बाजार उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद

रत्नागिरी दि. १४ : येथील र.ए. सोसायटीच्या जीजीपीएस शाळेमध्ये वार्षिक बाजाराचे आयोजन करण्यात आले होते उपक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व र.ए.सोसायटीचे विश्वस्त रवींद्र (मुन्ना) सुर्वे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अपूर्वा मुरकर उपस्थित होत्या.
यंदाच्या या उपक्रमाची थीम ‘स्प्राउट अँड स्पार्कल’ अशी ठेवण्यात आली होती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना व्यावहारिक जगाची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
नावीन्यपूर्ण स्टॉल्स
‘स्प्राउट’ म्हणजे अंकुरण आणि ‘स्पार्कल’ म्हणजे चमक, या थिमला अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तू, शोभेच्या वस्तू आणि पर्यावरणपूरक उत्पादनांचे स्टॉल्स लावले होते.त्यामध्ये प्रामुख्याने पालेभाज्या ,नारळ, काजूगर यांचे स्टॉल होते.
खाद्यजत्रा :
घरगुती आणि आरोग्यदायी पदार्थांच्या स्टॉल्सना पालकांनी मोठी पसंती दिली.
व्यावहारिक शिक्षण :
वस्तूंची विक्री कशी करावी, ग्राहकांशी संवाद कसा साधावा आणि नफा-तोटा कसा मोजावा, याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाले.
शाळेच्या मैदानावर भरलेल्या या बाजारपेठेत पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. मुलांकडून वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळालेली ही एक उत्तम संधी आहे, अशा शब्दांत पालकांनी शाळेचे कौतुक केले.
शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.



