महाराष्ट्ररत्नागिरी

रत्नागिरीसाठी कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेसमध्ये 2AC, 3AC, 3E या क्लास आरक्षण कोट्यामध्ये ५०% तर स्लीपर कोटामध्ये २५% वाढ

रत्नागिरी दि. १३ :- सहा मार्च रोजी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची 23वी बैठक नवी मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील समिती सदस्य तसेच कोकण रेल्वे चे बोर्ड ऑफ डायरेक्टर उपस्थित होते. या वेळी प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी यापूर्वीच रत्नागिरी स्टेशन च्या कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, वंदेभारत च्या कोटा वाढवण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. या पूर्वीच झालेल्या समिती च्या बैठकीत हा कोटा वाढविण्यास मान्यता देण्यात आली होती, पण अंमलबजावणी झाली नव्हती. याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी मे महिन्यापासून होणार असून PRS टर्मिनलवर त्याप्रमाणे पाच मार्च रोजी सुधारणा करण्यात आली असून, मे महिन्यापासून रत्नागिरी स्टेशनवरील कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेसमध्ये 2AC, 3AC, 3E या क्लासमध्ये ५०% वाढ करण्यात आली असून स्लीपर कोटामध्ये २५% वाढ करण्यात आली आहे.

तसेच जनशताब्दीमध्ये चेअर कार, व सेकंड सिटींग या दोन्ही क्लासमध्ये आणि वंदेभारत च्या चेअर कारमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड येथील प्रवासी वर्गाला होणार आहे. सदर कोटा हा मडगाव येथून रत्नागिरी स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर मागणी मान्य केल्याबद्दल सचिन वहाळकर यांनी वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव तसेच कोकणरेल्वे सीएमडी संतोषकुमार झा यांचे आभार मानले. भविष्यात प्रशासनाकडून हा कोटा टप्या टप्प्याने वाढवण्यास मान्यता दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी स्टेशन हे एकमेव स्टेशन आहे जिथे अजूनही रिमोट कोटा सिस्टिम कार्यरत आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच सचिन वहाळकर यांच्या प्रयत्नानून रत्नागिरीत चार गाड्यांमधील कोटामध्ये वाढ झाली.

बैठकीत कोकण रेल्वेच्या घसरलेल्या टाइमटेबलचा मुद्दा सचिन वहाळकर यांनी मांडला. अनेक गाड्या उशिराने धावत असून तेजस एक्सप्रेससारखी प्रीमियम गाडीच टाइमटेबल पूर्ण विस्कळीत झालं असून, प्रशासनाने विशेषतः रत्नागिरी जिल्हातील ऑपरेशन्सकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करत या मध्ये सुधारणा अपेक्षित आहेत, कारण मुंबईत पोचण्यास तसेच डाउन ट्रेन्स लेट होत असल्याने अवेळी आगमन होणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी वर्गाची ससेहोलपट होत असल्याचे निर्दशनास आणून दिले. यावर हि वस्तुस्थिती असल्याचं मान्य करत, मार्गावर सुरू असलेली मेंटेनन्सची काम, वाढलेल्या गाड्यांची संख्या, मुंबई, पनवेल येथील मध्य रेल्वेचे ब्लॉक यामुळे हा विलंब होत असून येत्या महिन्याभरात ही काम पूर्णत्वास जाणार असून, यानंतर गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच तेजस एक्सप्रेसच्या पूर्ण विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाकडे विशेष लक्ष देऊनही गाडी पुन्हा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट आश्वासन प्रशासनाने दिले.

याच बैठकीत सचिन वहाळकर यांनी रत्नागिरी दिवा गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याचा मुद्दा उपस्थित केला असता, कोकण रेल्वे प्रशासन मध्य रेल्वेकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून हा विषय पूर्णपणे मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने त्या पातळीवर हा निर्णय होणे अपेक्षित आहे. यावर हा निर्णय होई पर्यंत दिव्या वरून हि गाडी उशिरा सुटत असल्याने रत्नागिरी स्टेशन वर पोचण्यास रात्री खूप उशीर होत असून या गाडीच्या दिव्या वरून सुटण्याच्या वेळेत बदल करून ती लवकर सोडण्यात येण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत या बाबत येत्या आठ दिवसात मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दिवा रत्नागिरी लवकर सोडण्या बाबत निर्णय घेतला जाईल अस आश्वासन प्रशासनाने दिले.

रत्नागिरी स्टेशनवरील दुचाकी पेड पार्किंगवर शेड करण्याची, तसेच पार्किंग च्या जागेत पट्टे, व पेड पार्किंग चे बोर्ड लावण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी मांडली असता याची अंमलबजावणी तात्काळ कण्याचे निर्देश संतोषकुमार झा यांनी दिले व दुचाकी पार्किंग वरील शेड साठी आर्थिक तरतूद करून हे काम कण्याचे निर्देश कोकण रेल्वे चीफ इंजिनियर प्रकाश साहेब यांना देत हि गैरसोय लवकरच पूर्ण होईल हे स्पष्ट केले.

याच बैठकीत वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या ट्रेन ला खेड येथे थांबा देण्याची मागणी सचिन वहाळकर यांनी केली. त्यावर असा प्रस्ताव तयार करून तो रेल्वे बोर्डा कडे पाठवण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला.

सदर बैठकीला महाराष्ट्र विधानसभा प्रतिनिधी म्हणून आमदार संजय केळकर तसेच पार्लमेंट प्रतिनिधी म्हणून खासदार अनुप धोत्रे हेही या बैठकीत उपस्थित होते.

सदर बैठकीत कोकण रेल्वेच्या आगामी प्रकल्पा संबंधित, तसेच रेल्वेच्या आर्थिक स्थिती बाबत, विद्यमान कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्याप्रवासी गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या, रो रो सेवा, याबाबतीत एक प्रेझेंटेशन प्रशासनाकडून करण्यात आले. आगामी वैभववाडी कोल्हापूर मार्गा बाबत सदस्यांच्या प्रश्नावर, हा मार्ग भारतीय रेल्वे करणार आहे परंतु याचे काम कोकण रेल्वे ला करण्यास मिळाल्यास त्याचा महामंडळाला फायदा होऊ शकेल यामुळे हे काम करण्यास कोकण रेल्वे इच्छुक असून त्या दृष्टीने प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन श्री संतोषकुमार झा यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button