रत्नागिरीसामाजिक

इच्छामरण एक अस्वस्थ करणारं आत्मकथन!

एखाद्या व्यक्तीला लेखनाची कोणतीही आवड नसताना केवळ बालपणापासून झेललेल्या विविध प्रसंगातून अस्वस्थ बनलेली वृत्ती मोठं झाल्यावर लेखन कर्तृत्वाला कसा जन्म देवू शकते आणि यातून समाजासमोर एक भयावह वास्तव स्पष्ट शब्दात मांडून ज्या धाडसाने यासर्व प्रसंगाना तोंड दिलं, याचं सविस्तर तसेच प्रसंगी अंगावर काटा येईल, असं केलेलं सडेतोड वर्णन म्हणजे इच्छामरण एक सत्यकथा हे आत्मकथन आहे.

शालेय जीवनापासून बिनधास्त स्वभावाची असणारी मुलगी घरी वडिलांच्या शिस्तीमुळे काहीशी बंधनात वावरत होती. मात्र या मुलीने कधी मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. जे गुण एखाद्या धाडसी तरुणाच्या अंगी पाहायला मिळतात तसे किंवा त्यापेक्षा काकणभर अधिक सरस गुण ईच्छामरण या आत्मकथनाच्या ‘ संगीता ‘ या नाईकेच्या अंगी ओतप्रोत भरलेले पाहायला मिळतात. ज्या काळात सिनेमा गावातील कार्यक्रमा दरम्यान पडद्यावर अथवा टुरिंग टॉकीजमध्ये जावून पाहावा लागत होता, त्याकाळी संगीताला वडिलांनी सिनेमा पाहायला जाण्यास परवानगी नाकारली. या एकाच प्रसंगामुळे वडिलांचं नामकरण ‘ हिटलर ‘ असं बिनधास्तपणे करणारी संगीता वडिलांना मात्र खूप घाबरायची. असं असलं तरी प्रचंड मेहनती आणि धाडसी असणारे तिचे वडील हेच तिचे आदर्श होते. जीवनप्रवासात आई आणि आज्जीची लाभलेली साथ लेखिकेने वर्णन केलेल्या अनेक प्रसंगातून अधोरेखित होते.

शालेय जीवनात खोखो या खेळात करियर करणारी संगीता या खेळावर अपार प्रेम करणारी. आपल्या शाळा – महाविद्यालयाला खोखो या खेळात तालुका ते राज्यस्तरावर विजेतेपद मिळवून देण्यात संगीताचा मोठा सहभाग होता. खोखो या खेळातील कौशल्यामुळेच संगीताचा डॉ. भारत लोटे यांच्या सोबत वयात काहीसं अंतर असतानाही विवाह होवू शकला. संगीताचा स्वभाव धाडसी, जिद्दी, खोडकर, प्रयत्नवादी, बिनधास्त, स्पष्टवक्ता, हजरजबाबी असा असल्याने तीच्या या स्वभावाचे गारुड डॉ.लोटे यांच्यावर कसं झालं? याचे अनेक हृदयस्पर्शी प्रसंग इच्छामरण या आत्मकथनात वाचायला मिळतात. डॉ. भारत लोटे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील भांबेड, ओणी आणि रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्य हे एखाद्या दीपस्तंभा सारखे असल्याचे अनेक हृदयस्पर्शी आणि काळीज पिळवटून टाकणारे प्रसंग वाचून या माणसापुढं अनेकदा नतमस्तक व्हावं असंच वाचकांना वाटत राहील. आरोग्य सेवेचा लाभ समाजातील तळागाळात असणाऱ्या प्रत्येक घटकाला देण्यासाठी डॉ.भारत लोटे हे नेहमी प्रयत्नशील असंत. स्वतःचा संसार काटकसरीने करुन गोरगरीब रुग्णाना सढळ हस्ते मदत कारण्यावर डॉ.भारत यांचा प्रयत्न असल्याचे पुस्तकातील अनेक प्रसंगातून दिसून येते.

डॉ.भारत लोटे यांना कोकणातच रुग्ण सेवा करायची होती. त्यांच्या दृष्टीने पैसा नव्हे तर, रुग्णसेवा महत्वाची होती. त्यांच्या आरोग्य सेवेचे अनेक हृदयस्पर्शी प्रसंग वाचून मन हेलावून जाते. रुग्ण सेवा करताना स्वतःच्या संसारात अनेक अडचणी येवून देखील डॉ.भारत लोटे यांनी पत्नी संगीताच्या मदतीने या सर्व अडचणीवर कशी मात केली ? याबाबतचे पुस्तकात वर्णन केलेले अनेक प्रसंग अंगावर काटा आणतात. संगीता यांनी परिस्थितीवर मात करत संसारात कसा आनंद निर्माण केला ? याबाबत त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे पुस्तकात अनुभवायला मिळतात. पती – पत्नीच्या उत्कट प्रेमाची ही एक प्रवाही कादंबरी असल्याचेही प्रसंगी जाणवते. डॉ.भारत लोटे यांनी आयुष्यभर पैसा नव्हे तर, केवळ रुग्णांचाच विचार केला. मात्र त्यांच्या आजारपणात त्यांना चुकीच्या उपचारांमुळे जे भोगावं लागलं, ते कोणालाही लागू नये असे सर्व प्रसंग वाचताना वाटत रहाते.

पुस्तकाच्या अखेरीस प्रत्येक प्रसंग वाचताना नकळत डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. डॉक्टर भारत लोटे आणि संगीता लोटे यांच्यावर आलेले गंभीर प्रसंग म्हणजे, जणू आपल्याच कुटुंबातील व्यक्तीवर झालेला आघात असल्याचे वाटू लागते. इच्छामरण या आत्मकथनात गोरगरीब रुग्णांची मनापासून सेवा करणाऱ्या एका यशस्वी डॉक्टरना इच्छामरण मागावे लागते, या प्रसंगाने तर आरोग्य यंत्रणा आणि संबंधित सर्वांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, असेच वाटू लागते. डॉ. भारत लोटे यांची केवळ रुग्णांनाच नव्हे तर, आरोग्य क्षेत्राला खूप मोठी गरज होती.डॉ. भारत लोटे यांच्यासारखे वैद्यकीय अधिकारी तयार व्हायला अनेक तपं उलटून जातात. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारीच म्हटली पाहिजे. संगीता लोटे यांनी रुग्णालयात असताना जे प्रसंग झेलले, अशी वेळ कोणावरही येऊ नये, असेच प्रत्येक प्रसंग वाचताना वाटत राहते. याचे मुख्य कारण प्रत्येकाला संगीता भारत लोटे बनणे सध्याच्या घडीला शक्य नाही.

इच्छामरण हे जरी आत्मकथन असलं तरी, यातील अनेक प्रसंग हे एखाद्या प्रवाही आणि परस्परांमधील उत्कट प्रेमाची साक्ष देणाऱ्या कादंबरी सारखेही भासू लागते. हे आत्मकथन वाचताना वाचक यामध्ये स्वतःला देखील सामील करून घेतो आणि तो, या लोटे कुटुंबाचा एक भाग बनून जातो, हेच या लेखनाचे खरे यश आहे. लेखनाचे कोणतेही अंग नसताना बालपणापासून अगदी विवाहा नंतर झेललेल्या विविध प्रसंगांना तोंड देत असताना, संगीता भारत लोटे यांनी जे धैर्य दाखवलं त्यातूनच त्यांच्या मनात दडलेले अनेक विचार शब्दरूपाने प्रवाही झाले आणि ते सारे प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे करण्यात लेखिकेला यश आले. या पुस्तकातून खचलेल्या अनेकांना जगण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळू शकतो, एवढ्या ताकतीचे लेखन संगीता लोटे यांनी केले आहे. इच्छामरण एक सत्यकथा या पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली. केवळ ५२ दिवसात पहिली आवृत्ती संपून १५ जानेवारी २०२५ रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. वाचकांचा या सत्यकथेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाचे मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार संतोष घोंगडे यांनी अप्रतिम असं साकारला आहे. राजा गायकवाड यांनी मोजक्या शब्दात पुस्तकाला छान प्रस्तावना दिली आहे.

इच्छामरण एक सत्यकथा, न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, लेखिका : संगीता भारत लोटे, किंमत : ३५०/- रु.

▪️परीक्षण : जे. डी. पराडकर 9890086086

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button