रत्नागिरी

संगमेश्वर मधील मुलांनी रामपेठ येथे जपलीय आट्यापाट्या खेळाची परंपरा!

५० मुलं दररोज होतात सहभागी; परंपरा जपण्यात संगमेश्वर आघाडीवर

संगमेश्वर दि. २८ ( प्रतिनिधी ):- मोबाईलवरील विविध खेळ आणि क्रिकेट या मोठ्या विश्वात सध्याची मुले जुने पारंपरिक खेळ विसरून गेली आहेत असं नेहमीच म्हटलं जातं . काही खेळांची तर मुलांना नावे देखील माहिती नाहीत अशी स्थिती आहे . पूर्वीचे ग्रामीण खेळ म्हणजे मौज मज्जा आणि मस्तीचा त्रिवेणी संगम होता . होलीकोत्सवाला म्हणजे फाकपंचमी पासून ‘ आट्यापाट्या ‘ खेळाला सुरूवात होते . बदलत्या काळात आट्यापाट्यांसारखा खेळ विस्मरणात जात असताना कोकणच्या ग्रामीण भागात आजही हे पारंपारिक खेळ मोठ्या उत्साहाने खेळले जात आहेत. संगमेश्वर येथील मुले रामपेठ आठवडा बाजार येथे फाक पंचमीपासून दरवर्षी आट्यापाट्यांचा खेळ खेळून होलीकोत्सवातील पूर्वीच्या परंपरा जपण्यास हातभार लावत आहेत.

होळीचे सर्व दिवस दररोज ४० ते ५० मुले रामपेठ येथे आट्यापाट्या खेळायला असतात . मोठी मुले लहान मुलांना हा खेळ शिकवत आणि त्या खेळाचे वैशिष्ट्य – महत्व देखील समजावून सांगतात . शरीर सतत हलते ठेवणाऱ्या आट्यापाट्या या खेळामुळे कमालीचा व्यायाम होतो . खूप वेळ चालणाऱ्या या खेळामुळे नंतर भूकही सपाटून लागते . मध्यरात्री दोन – तीन वाजेपर्यंत या खेळाची मौजमज्जा सुरू असते . फाल्गुन सुरू झाल्यानंतर सर्व सवंगड्यांच्या डोळ्यासमोर आट्यापाट्या खेळाचे चित्र उभे रहाते . खेळताना सारे या खेळात चांगलेच एकरूप होतात . बदलत्या काळात आता हा खेळ फार तुरळक ठिकाणी खेळला जातो . संगमेश्वर येथील मुलांनी मात्र या खेळाची परंपरा जपली आहे.

आट्यापाट्या म्हणजे एका संघातील खेळाडूंनी दुसऱ्या संघातील खेळाडूंना ठराविक जागेमध्ये (पाटीत) अडविणे व अडविलेल्या खेळाडूंनी हुलकावणी देऊन निसटून जाणे, अशी स्थूल रूपरेषा असलेला हा महाराष्ट्रीय खेळ आहे . या मैदानी खेळात कोंडी, हुलकावणी, शिवाशिवी अशा प्रकारांचा समावेश होतो. पूर्वी या खेळासाठी सर्वमान्य नियम नव्हते. आट्यापाट्यांचे क्रीडांगण प्रचलित नियमांनुसार सूरपाटी व इतर नऊ पाट्यांत विभागलेले असते. खेळ जेथून सुरू होतो त्या पाटीला कपाळपाटी म्हणतात. शेवटच्या पाटीला लोणपाटी म्हणतात. सर्व पाट्यांना दुभागून जाणाऱ्या पाटीस मृदंगपाटी व सूरपाटी व त्यावरील खेळाडूस मृदंग वा सूर म्हणतात.खेळाडूंचे दोन संघ असतात व त्यांत प्रत्येकी नऊ खेळाडू असतात. अधिकृत सामन्याच्या वेळी प्रत्येकी पाटी, सूरपाटी व कपाळपाटी यांसाठी एकेक असे एकूण आठ पंच व एक सरपंच असतो. याशिवाय वेळाधिकारी व गुणलेखकही असतो. खेळातील पाट्यांना दिलेली नावेही सर्वांना परिचित आणि प्रचलित असणारी असल्याने लक्षात ठेवणे सोपे जाते.

————————————————

 परंपरा जपणे हीच सणांची शिकवण!

संगमेश्वर येथील सर्व मुलं रामपेठ येथे एकत्र येऊन दरवर्षी विविध सणांदरम्यान परंपरा जपण्यात आघाडीवर असतात. सणातील पूर्वीच्या परंपरा जपणे आणि त्यानुसार मार्गक्रमण करणे हीच सणांची खरी शिकवण असते. संगमेश्वर येथील सर्व मुले रामपेठ आठवडा बाजार येथे एकत्र येऊन फाक पंचमीपासून दररोज रात्री दहा ते दोन या वेळेत दरवर्षी होळी सणादरम्यान आट्यापाट्यांचा हा जुना खेळ खेळत आहेत . विशेष म्हणजे खेळ खेळत असताना मोठी मुले लहान मुलांना या खेळात सहभागी करून या खेळाचे नियम समजावून सांगतात. यामुळेच रामपेठ येथे संगमेश्वर येथील मुलांकडून खेळला जाणारा आट्यापाट्यांचा खेळ हा विनाखंड सुरू आहे.

-अमोल शेट्ये व्यापारी, सामाजिक कार्यकर्ता रामपेठ संगमेश्वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button