रत्नागिरी शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शासन स्तरावर मंजूर

रत्नागिरी दि. २८ : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने सुमारे २ कोटी ९३ लाख २३ हजार २७९ रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २६ फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला असून, यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प केवळ कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून, तो रत्नागिरी शहराच्या आरोग्यदायी, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी एक मजबूत पाया आहे. रत्नागिरी नगरपालिका या प्रकल्पाची अंमलबजावणी पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने करेल, अशी स्पष्ट भूमिका रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी मांडली आहे.
मंजूर आराखड्यानुसार, हा प्रकल्प तीन मुख्य भागांत विभागला गेला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यासाठी १ कोटी ४९ लाख १२ हजार ५११ रुपये खर्च केले जातील. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ७९ लाख ९३ हजार १३८ रुपये, तर शास्त्रोक्त पद्धतीने कचरा भूमीभरणा करण्यासाठी ६४ लाख १७ हजार ६३१ रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.
या एकूण निधीमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा १ कोटी ४२ लाख ८० हजार ५०० रुपये असून, राज्य शासन १ कोटी १४ लाख २४ हजार ४०० रुपये देणार आहे. उर्वरित २८ लाख ५६ हजार १०० रुपये रत्नागिरी नगरपरिषदेला स्वतःच्या निधीतून उभे करावे लागणार आहेत. जर प्रकल्पाची किंमत मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढली, तर वाढीव खर्चाची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची असेल. हा प्रकल्प राबविताना पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने काही कडक अटी घातल्या आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेला तात्काळ ई-निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीची आणि पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे अभिलेखात ठेवणे बंधनकारक आहे. आगामी काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीची आणि विहित मुदतीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरवासियांना सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे की रत्नागिरी शहरासाठी घनकचरा व्यवस्थापन (Waste Recycling Plant) प्रकल्प शासन स्तरावर मंजूर झाला आहे. हा प्रकल्प आपल्या शहराच्या स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे सौ. सुर्वे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर होणार असून पर्यावरण प्रदूषणात मोठी घट होईल. तसेच दुर्गंधी, रोगराई आणि अनियंत्रित कचरा ढिगाऱ्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. भविष्यात रत्नागिरी हे स्वच्छ आणि हरित शहर म्हणून ओळखले जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मान्यता मिळवून देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे मी मनःपूर्वक आभार मानते . त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे हा प्रकल्प शक्य झाला आहे, असे त्यांनी सांगितले.



