रत्नागिरी जिल्ह्यातील ३४३ गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

रत्नागिरी दि. २७ :- रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपयांचा ‘पाणीटंचाई कृती आराखडा’ तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील ३४३ गावे आणि ८१४ वाड्यांना दिलासा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मार्च ते जून या कालावधीत अनेक ठिकाणी भूगर्भातील पाणीपातळी खालावते. अशा परिस्थितीत दुर्गम वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे किंवा तात्पुरत्या नळ योजना राबवणे अनिवार्य असते. पाणी टंचाई आराखड्यात जिल्ह्यातील ३४३ गावे आणि ८१४ वाड्या प्रभावित आहेत.
या गावे आणि वाडीतील टंचाई निवारणास ११ कोटी ७० लाख ७८ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्च २०२६ ते जून २०२६ पर्यंत या कालावधीत टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.



