रत्नागिरी

व्यापारी पैसा फंड संस्थेला राज्यस्तरीय प्रज्ञा गौरव पुरस्कार

विश्व समता कलामंच संस्था लोवले या संस्थेतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरव

संगमेश्वर दि. १८ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर पंचक्रोशीतील होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय करण्याच्या दृष्टिकोनातून १९२९ स्थापन झालेल्या व्यापारी पैसा फंड संस्थेला आता ९७ वर्षे पूर्ण झाली आहेत. लवकरच संस्था आपला शतक महोत्सवी कार्यक्रम पार पाडणार आहे. गेल्या ९७ वर्षात केलेल्या शैक्षणिक कामगिरीची दखल घेऊन विश्व समता कला मंच लोवले या संस्थेतर्फे व्यापारी पैसा फंड संस्थेला नुकताच राज्यस्तरीय प्रज्ञा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून संस्थेचे अभिनंदन केले जात आहे.

विश्व समता कला मंच संस्था समाजातील विविध व्यक्तींच्या आणि संस्थांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देत असते. व्यापारी पैसा फंड संस्थेने गेली ९७ वर्षे शिक्षण क्षेत्रात जे भरीव योगदान दिले आहे त्याबरोबरच संस्थेची आणि प्रशालेची सुरू असलेली प्रगती आणि घोडदौड पाहून संस्थेचा उचित सन्मान व्हावा या दृष्टीने व्यापारी पैसा फंड संस्थेला प्रज्ञा गौरव पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल – श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विविध मान्यवरांच्या हस्ते व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, शिक्षिका अर्जिता कोकाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. व्यापारी पैसा फंड संस्थेला पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांनी विश्व समता कला मंच संस्थेचे अध्यक्ष मनोज जाधव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यस्तरीय प्रज्ञा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आज सन्मानपत्र, सन्मानचिन्ह यासह संगमेश्वर बाजारपेठेतून एक भव्य रॅली काढली आणि आनंद व्यक्त केला. यावेळी संगमेश्वर बाजारपेठेतील अनेक व्यापारी मंडळी आणि ग्रामस्थांनी संस्था आणि प्रशालेचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले. असे पुरस्कार संस्थेला भविष्यात आणखी प्रगती करण्यासाठी नक्कीच पाठबळ देतील अशी भावना संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी व्यक्त करून विश्व समता कला मंच संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button