अमेरिकेत राहणारी आर्या युनायटेड गुरुकुलच्या दैनंदिन कामकाजात नित्यनेमाने होतेय सहभागी
भारतीय संस्कृती कळावी हा उद्देश

संगमेश्वर दि. १५ ( प्रतिनिधी ):- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा वसा घेऊन चालू असणारा परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणचा एक स्वतंत्र विभाग म्हणजे युनायटेड इंग्लिश स्कूलचा पंचकोशाधारित गुरुकुल विभाग अन्नमय, प्राणमय, मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या आधारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसन अनेक उपक्रमांच्या माध्यमातून गुरुकुल मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातो.भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीचा अंगीकार केलेल्या या गुरुकुल विभागातील विविध उपक्रम अनेकांसाठी कौतुकाचे ठरत असताना गेली सलग तीन शैक्षणिक वर्ष या गुरुकुल मध्ये थेट अमेरिकेतून एक मुलगी भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गुरुकुलच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होते.
परशुराम एज्युकेशन सोसायटीने दूरदृष्टीने आणि ध्येय धोरणाने योजलेल्या नियोजनानुसार दररोज दिवसभर अकरा तास आणि वर्षभरात जवळपास २६० दिवस चालणाऱ्या या अनोख्या वेगळ्या वाटेवरून मार्गक्रमण करणाऱ्या गुरुकुल विभागात संस्कार, संस्कृती, परंपरांचे संवर्धन करत कौशल्य प्रशिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, मैदानी खेळ इत्यादी अनेक गोष्टी मुलांमध्ये सहज रुजवणारी उपक्रम आधारित अध्ययन -अध्यापन प्रक्रिया होत असते.
सकाळी उपासना, प्रार्थना,व्यायाम, योगासने यानंतर संगणक, दैनंदिन अध्ययन, संगीत,हस्त कौशल्य अशा विविध दैनंदीन अनुभवांसोबतच भात लावणी,आषाढी एकादशी, गणेशमूर्ती तयार करणे,निवासी शिबिरे अशा विशेष उपक्रमातही अत्यंत मनापासून सहभागी होणारी ही मुलगी म्हणजे आर्या ! अमेरिका शिकागो मध्ये नवव्या ग्रेड मध्ये शिकणाऱ्या आर्याची आई संपदा ह्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी. सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या रोहित यांच्याशी विवाह झाल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या सौ.संपदा ह्या आपल्या मुलीला म्हणजे कु.आर्याला भारतीय संस्कृती कळावी, भारतातील शिक्षण व्यवस्था कशी आहे ते समजावे यासाठी युनायटेड च्या गुरुकुल विभागात गेली सलग तीन वर्ष पाठवत आहेत.आर्याच्या अमेरिकेतील शाळेला ज्यावेळी सुट्टी असते त्यावेळी भारतात येणारी आर्या आवर्जून पूर्णवेळ गुरुकुल मध्ये उपस्थित असते.
पाश्चात्य जीवनशैलीचं सहज अनुकरण होत असलेल्या या काळात पाश्चात्य अभ्यासक्रम शिकणाऱ्या आर्याला भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण पद्धती परिचित व्हावी म्हणून गुरुकुल मध्ये पाठवण्याचा निर्णय घेणारी तिची आई सौ.संपदा आणि आईचा निर्णयाला तितकाच उत्तम प्रतिसाद देणारी आर्या दोघांचाही गुरुकुल विभागात सहभागी होण्याचा निर्णय निश्चित कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.



