विद्वानांचे कार्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आपली- डॉ. आशिष बर्वे
भारतरत्न डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात कोकणातील विद्वान कार्यशाळेची सांगता

रत्नागिरी दि. १२ : कोकणात प्रत्येक क्षेत्रात अनेक विद्वान होऊन गेले. खासकरून संस्कृत भाषेतील विद्वानांचे कार्य आजच्या युवकांना विशेषतः प्रेरणादायी आहे. त्यामुळे ही कार्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आपली आहे, असे प्रतिपादन श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.
चर्चासत्राचा आढावा रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी घेतला. ज्येष्ठ अभ्यासक श्रीकांत रांगणेकर आणि अनुया बाम, सिद्धी कोळेकर यांनी अनुभवकथन केले. यानंतर सहभागी शिक्षक, विद्यार्थ्याना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नोटिंग ऑफिसर सौरभ शिंदे यांनी आभार मानले.
सर रामचंद्र भांडारकर संस्कृत संशोधनाचे शिल्पकार : डॉ. कल्पना आठल्ये
मुळचे कोकणातील असणारे सर रामचंद्र गोपाळ भांडारकर यांनी कार्यकौशल्याच्या भारताच्या सांस्कृतिक परंपरेकडे वैज्ञानिक, ऐतिहासिक, संशोधनात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन दिला, असे सर रामचंद्र गोपाळ भांडारकर हे आधुनिक भारतातील संस्कृत संशोधनाचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन गोगटे -जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. सर भांडारकर यांनी शिक्षण, संशोधन, लेखन या क्षेत्रात भरीव कार्य केले. सोबतच समाज व धर्म सुधारणेकडे देखील विशेष लक्ष दिले. सर भांडारकर यांनी संस्कृत संशोधन क्षेत्राचा विस्तार केला व एक नवी दिशा दिली. त्यांनी विविध शिलालेख, हस्तलिखिते, नाणी तसेच विविध लिपी यांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला. संस्कृत भाषेची तोंडओळख करवून देणारे व संस्कृत भाषेचा व्याकरणदृष्ट्या पाया मजबूत करणारे भांडारकर पुस्तक पहिले व दुसरे लिहिले. भांडारकर यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच जन्मदिनी म्हणजेच ६ जुलै रोजी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन केली जिचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.
डॉ. काणे यांचा धर्मशास्त्र ग्रंथ अद्वितीय- डॉ. अनघा जोशी
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्राची केलेली मांडणी आदर्शवत आहे. कारण डॉ. काणे यांनी धर्मशास्त्रात हक्कापेक्षा कर्तव्यावर अधिक भर दिलेला आहे. शिवाय यात दुसऱ्याचे हितरक्षण आणि स्व कर्तव्य यांना अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे, म्हणूनच भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणेंचा धर्मशास्त्र ग्रंथ सर्वार्थाने अद्वितीय आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभागातील डॉ. अनघा जोशी यांनी केले. धर्म ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यात नैतिक, धार्मिक नियमांबरोबरच कायदेही सांगण्यात आलेले आहेत. थोडक्यात डॉ. काणेंच्या धर्मशास्त्रात कर्तव्य अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे प्रकर्षाने जाणवते. धर्मशास्त्रात केवळ व्रतवैकल्ये, पूजापाठ, पद्धती यांचाच समावेश नसून व्यक्ती समाजात वावरताना तिची कर्तव्ये, तिचे संस्कार, कायदे, आचारधर्म यासारख्या बाबींचा समावेश देखील होतो असे त्या म्हणाल्या.



