रत्नागिरी

देवरुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभिमानास्पद स्वच्छता मोहीम

लोकशाहीच्या महोत्सवानंतर झालेला कचरा साफ केला; अध्यक्ष सदानंद भागवत यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

देवरुख दि. १० ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये संगमेश्वर तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. या मतमोजणी व निकालांच्या उत्सुकतेपोटी व आपल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी किंवा विजय साजरा करण्यासाठी सर्व पक्षांचे व अपक्षांचे हजार, दीड हजार कार्यकर्ते ३०० च्या वर चार चाकी गाड्या व शेकडो दुचाकी घेऊन संस्थेच्या मैदानात जमले होते, प्रत्येक फेरीच्या मतमोजणीनंतर जल्लोष करत होते पण त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे, खाद्यपदार्थांचे रॅपर्स इतस्तत: टाकत होते. हा सर्व कचरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साफ केल्याने संस्थेचे अध्यक्ष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक प्राध्यापकांना धन्यवाद देत त्यांचे कौतुक केले.

संध्याकाळी ४ पर्यंत निकाल लागले आणि आपआपल्या उमेदवारांच्या विजयांच्या घोषणा देत, गुलाल उधळत सर्वजण ५ वाजेपर्यंत निघून गेले आणि लोकशाहीचा उत्सव पार पडला. पण त्यानंतर संस्थेच्या मैदानाचे रूप म्हणजे सर्वत्र फेकलेल्या बाटल्या आणि रॅपर्स यांचे साम्राज्य असे झाले होते. एक देशभक्त म्हणून आणि संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सदानंद भागवत यांना हे दृश्य पाहून खूप वेदना झाल्या. महागड्या चारचाकी व दुचाकी घेऊन स्वच्छ कपडे घातलेले कार्यकर्ते आणि नेते अशी घाण करत होते याचे नागरिक म्हणून त्यांना वैषम्य वाटले व कचऱ्याने भरलेल्या मैदानाचा व्हिडिओ करून त्यांनी समाज माध्यमांवर पाठवला आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळात शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थी व कर्मचारी वृंद यांना घेऊन मैदान साफ करण्याची मोहीम निश्चित केली.

इयत्ता १२ वी ची परीक्षा सकाळी १०:३० वाजता सुरू होणार होती आणि त्याआधी मैदान साफ करणे गरजेचे होते. सांगायला अभिमान वाटतो की ५०० विद्यार्थ्यांनी मैदान केवळ अर्ध्या तासात साफ केले. आणखीही एक गोष्ट आनंदाने सांगावीशी वाटते की स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणूक झालेल्या रुपेश भागवत यांनी देवरुख नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना साफसफाईला येण्याचे आवाहन केले आणि नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरने कचरा नेण्याकरिता नियोजन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अभिजीत शेट्ये, दत्ताराम नार्वेकर, संदीप वेलवणकर, श्रद्धा इंदुलकर, इंदुलकर, निमकर ही मंडळी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाली होती, आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे तर कौतुक करावे तेवढे थोडे असल्याचे भागवत यांनी नमूद केले .

या मोहिमेतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नागरिक बंधू-भगिनींना सिव्हिक सेन्स(नागरी जाणीव) येण्यासाठी आपल्यासारख्या समाजप्रेमींना खूप मेहनत घ्यायला लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेरित झालेला एखादा समूह कमी वेळातही मोठे काम करू शकतो.देशाला आणि समाजाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी सर्व सामान्यांमध्ये जागृती करण्याबरोबरच देशप्रेमी हातांनी प्रत्यक्ष काम केले तर आश्चर्यकारक गोष्टी घडू शकतात, फक्त यासाठी त्या त्या परिसरात कोणीतरी नेतृत्व करण्याची गरज असते. या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे, शिक्षक वर्गाचे तसेच कार्यकर्ते म्हणून आलेल्या नगरसेवकांचे संस्था अध्यक्ष सदानंद भागवत यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button