रायपाटण अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी रायपाटण खाडेवाडी-ताम्हाणे या पर्यायी मार्गास मंजुरी देण्याची मागणी

राजापूर, दि. ९ जुलै : राजापूर पूर्व विभागातील रायपाटण येथे मंजूर असलेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या दृष्टीने रायपाटण खाडेवाडी-ताम्हाणे या पर्यायी मार्गास शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी रायपाटणचे माजी सरपंच राजेश सदानंद नलावडे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संजय सदानंद नलावडे यांनी उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रायपाटण हे इतिहास काळात व्यापाराचे प्रमुख केंद्र राहिलेले आहे विकसित होत असलेल्या रायपाटणमध्ये महाराष्ट्र शासनाने अप्पर तहसीलदार कार्यालयास मान्यता दिली असून, या कार्यालयामुळे राजापूर पूर्व भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हवाई अंतराने रायपाटण जवळ असूनही काही गावाना सध्या रायपाटण-खाडेवाडी-ताम्हाणे दरम्यान डोंगररांग असल्याने पोलीस स्टेशनं, कॉलेज, हॉस्पिटल ला येण्यासाठी प्रवासासाठी मोठा वळसा घालावा लागतो.
या पार्श्वभूमीवर रायपाटण ताम्हाणे मधील डोंगर फोडून अथवा भुयारी मार्ग तयार करून पर्यायी रस्ता विकसित केल्यास जवळेथर, आजिवली,ताम्हाणे , जांभवली , आंगले, कोंडवशी, निखरे, राजापूर रेल्वे स्थानक, सोलिवडे, मोरोशी यांसह परिसरातील अनेक गावांचा रायपाटणशी थेट संपर्क होईल. तसेच भविष्यात रायपाटण येथे एसटी डेपो उभारण्यात आल्यास या मार्गाचा मोठा फायदा नागरिकांना होईल, व रायपाटण हे ठिकाण सर्वच गावांना अजून मध्यवर्ती ठिकाण होऊन सर्व सामान्य जनतेला याचा फायदा होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय या मार्गामुळे देवरुख, साखरपा, भांबेड, परुळे, हरळ येरडवं करक, पांगरी, पाचल, तळवडे, रायपाटण, येळवण, धामणपे, बागवे आदी भागातील नागरिकांना कणकवली व राजापूर रेल्वे स्थानकाकडे जाणे अधिक सोयीचे होईल. त्यामुळे राजापूर पूर्व भागाच्या विकासाला गती मिळून अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेची गैरसोय दूर होईल, असा विश्वास व्यक्त करत या पर्यायी मार्गास तातडीने मंजुरी देण्याची मागणी राजापूरचे आमदार भैयाशेठ सामंत तसेंच जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कडे ही निवेदने सादर करण्यात आली आहे.



