केळ्ये गावचे सुपूत्र मनोज जाधव यांना “विश्व समता राज्यस्तरीय आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

तरवळ दि. ९ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये गावचे सुपूत्र व सध्या जिल्हा परिषद आदर्श शाळा रानपाट, ता. रत्नागिरीतील उपक्रमशील शिक्षक मनोज शिवराम जाधव यांना विश्व समता कला मंच लोवले ता. संगमेश्वर तर्फे विश्व समता राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मनोज जाधव यांचे शैक्षणिक कार्य खूप मोठे असून ते शिष्यवृत्ती परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतात. आत्तापर्यंत इयत्ता पाचवीतील प्रतिवर्षी १०० % विद्यार्थी परीक्षेला बसवून उत्तम रिझल्ट लावत आहेत. रानपाट ही तशी दुर्गम भागातील शाळा. पालकवर्ग शेतकरी आणि मजुरी करणारा असा आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून घेण्यासाठी सक्षम नाहीत. अशा परिस्थितीत मनोज जाधव यांनी सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने आत्ता पर्यंत दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले आहेत. संकट समयी लॉक डाऊनच्या काळातही ऑनलाईन अध्यापन स्पर्धा उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याच सोबत त्यांचा प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांचे संचलन आणि पंचरंगी कवायत हे उपक्रम विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कामाचे वेळोवेळी बोंडये केंद्र, खालगाव बीट तसेच रत्नागिरी तालुक्यातून अभिनंदन करण्यात आले आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन विश्व समता कलामंच लोवले ता. संगमेश्वर यांनी घेतली. आणि त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. सदर पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण संगमेश्वर येथे दिनांक १५/०२/२०२६ रोजी करण्यात येणार आहे.
श्री. मनोज जाधव यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक भितळे तसेच सहकारी शिक्षक यांनीही अभिनंदन केले. त्याच बरोबर पालक, ग्रामस्थांकडून आणि परिसरातील लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.



