रत्नागिरी

शेतकऱ्यांना परदेशवारीची सुवर्णसंधी : युरोप आणि चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शासनाचे २ लाखांपर्यंत अनुदान

रत्नागिरी, दि. ४ ऑगस्ट :- शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढविण्यावर समाधान न मानता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप व चीन देशांच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

जागतिक स्तरावर शेतीमध्ये होत असलेले बदल आणि विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

अनुदानाचे स्वरूप आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचा लक्षांक (कोटा) निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये खालीलप्रमाणे आरक्षण असेल:

१ महिला शेतकरी

१ केंद्र/राज्य स्तरावरील कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेते शेतकरी

३ इतर शेतकरी

(लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, जिल्हास्तरावर सोडत (लॉटरी) काढून लाभार्थ्यांची निवड केली जाईल.)

निवडीसाठी प्रमुख अटी व निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने काही महत्त्वपूर्ण अटी निश्चित केल्या आहेत:

वय आणि व्यवसाय: शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच असावे. तो कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थेत नोकरीस नसावा (तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता नसावा).

पासपोर्ट अनिवार्य: अर्ज करताना शेतकऱ्याकडे किमान एक वर्ष वैध मुदत असलेला पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.

कुटुंबातील एकालाच संधी: शेतकरी कुटुंबातून (पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले) केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. स्वखर्चानेही इतर सदस्याला सोबत नेण्यास परवानगी नाही.

फार्मर आयडी: शेतकऱ्याचे ‘अॕग्रीस्टॅक’ (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

यापूर्वी कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा. शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असून, तसे एम.बी.बी.एस. (MBBS) डॉक्टरांचे प्रमाणपत्र व कोरोना तपासणी अहवाल (निवड झाल्यानंतर) देणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे

१. चालू कालावधीचा (गेल्या ६ महिन्यांतील) ७/१२ व ८ अ उतारा

२. आधार कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स प्रत

३. वैध पासपोर्टची झेरॉक्स प्रत

४. डॉक्टरांकडून मिळालेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र

कुठे करावा अर्ज?

ज्या शेतकऱ्यांना या परदेश दौऱ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button