रत्नागिरी पोलीस दलाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने रुट मार्च

रत्नागिरी दि. ६ :- ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तसेच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे उद्देशाने, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दित रुट मार्चचे आयोजन करणेत आलेले होते.
या रुट मार्चच्या माध्यमातून जिल्ह्याभरात पोलीस दलाची ठोस उपस्थिती अधोरेखित करण्यात आलेली असून, समाजकंटक व कायदा भंग करणाऱ्यांना कडक संदेश देण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन पुर्णतः सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या रुट मार्चव्दारे देण्यात आलेला आहे.
सदरचे रुट मार्च पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी रुट मार्चमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रमुख, पोलीस अंमलदार, दंगल नियंत्रण पथक (आर.सी.पी.), एस.आर.पी.एफ. कंपनीचे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड दलाच्या जवानांचा सहभाग होता.
तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने, देवरुख पोलीस ठाणे हद्दिमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे यांचे नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दलातर्फे मतदान जनजागृती रॅली व पथनाटय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमामध्ये देवरुख पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, तसेच आठल्ये सप्रे महाविद्यालयाचे शिक्षक वर्ग व विद्यार्थी, महसूल विभाग व गटविकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित राहीलेले होते.



