रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई

१७ गुन्हे उघडकीस, २७ आरोपींना अटक व रु ६.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी दि. २९ :- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करताना. १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यात २७ आरोपींना अटक करण्यात आली असून, रु ६.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे सेवन, विक्री व तस्करी यांना प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली “मिशन फिनिक्स” हा विशेष अमली पदार्थ विरोधी उपक्रम दिनांक 25 मे 2025 पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सन 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

“मिशन फिनिक्स” हा उपक्रम केवळ गुन्हे दाखल करण्यापुरता मर्यादित नसून, युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविणे, समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे आणि अमली पदार्थमुक्त रत्नागिरी घडविणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

“मिशन फिनिक्स” अंतर्गत सन 2026 मध्ये अमली पदार्थाविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 08 अमली पदार्थ सेवनाच्या तर 09 अमली पदार्थ बेकायदेशीर ताब्यात बाळगल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस पथकांनी प्रभावी छापेमारी व तपास मोहीम राबवून कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राप्त सुचनांनुसार सदर कारवाईदरम्यान एकूण 27 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ब्राऊन हेरॉईन, गांजा तसेच इतर अमली पदार्थांसह एकूण रु 6,64,593/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर आळा घालण्यासाठी केलेल्या या कारवायांमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ पुरवठा साखळीवर प्रभावी परिणाम झाला आहे.

तसेच संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईबरोबरच आवश्यक त्या प्रतिबंधक उपाययोजना व प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, अमली पदार्थांच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर संबंधित पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, गोपनीय तपास व नियमित छापेमारीच्या माध्यमातून अमली पदार्थाविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अमली पदार्थांच्या विरोधात ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) धोरण अवलंबून कार्यरत असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button