रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृहसाठी ५ रुपये वसुली, ठाकरे युवासेना आक्रमक

ठेकेदारावर कारवाई करण्याची जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांची मागणी

रत्नागिरी दि. २९ : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृहसाठी (Urinal) बेकायदेशीरपणे 5 रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी आज कोंकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील ‘Pay & Use Toilet’ च्या बोर्डावर स्वच्छतागृहसाठी प्रति व्यक्ती 5 रुपये शुल्क लिहिले आहे. कंत्राटदाराकडून हे शुल्क प्रवाशांकडून सक्तीने वसूल केले जात आहे.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवर लघवीची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र, येथील कंत्राटदार नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

“गरीब प्रवाशांची लूट” – युवासेना

“दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, वृद्ध आणि गरीब प्रवाशांना याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली ही बेकायदेशीर वसुली सुरू असणे अत्यंत संतापजनक आहे,” असे प्रसाद सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

युवासेनेच्या 3 प्रमुख मागण्या

मोफत सुविधा : स्वच्छतागृहसाठी आकारले जाणारे 5 रुपये शुल्क त्वरित बंद करून ही सुविधा मोफत करावी.

कंत्राटदारावर कारवाई : नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना लुटणाऱ्या कंत्राटदारावर कडक दंडात्मक कारवाई करावी.

स्पष्ट फलक : स्वच्छतागृहसाठी कोणतीही फी नाही, ही सुविधा मोफत आहे’ असे फलक स्थानकावर ठळकपणे लावावेत.

आंदोलनाचा इशारा

रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने प्रवाशांच्या हक्कासाठी स्थानकावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असेही निवेदनात नमूद आहे.

जर यावर उचित कार्यवाही झाली नाही तर ठेकेदाराचा माणूस आतमध्ये दिसणार नाही असे प्रसाद सावंत यांनी या भेटी दरम्यान स्पष्ट सांगितले. तसेच रेल्वे स्थानक रोड वरील दुभाजक मधील झाडे वाहन चालकांसाठी धोकादायक असल्याने ती झाडे आकारामध्ये तोडावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. यावेळी रितेश लोखंडे, निलेश पवार, साई गावडे, निखिल बने, ओमकार कारेकर उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button