रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम- “मिशन गस्त”

नागरिकाभिमुख पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षितता या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत विविध नाविन्यपूर्ण मिशन, प्रकल्प व तंत्रज्ञानाधारित उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलीस–नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
याच संकल्पनेतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे “मिशन गस्त” हा एक विशेष लोकाभिमुख उपक्रम दि. 16/08/2025 पासून जिल्ह्यात अंमलात आणण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी एकूण 1150 QR Code बसविण्यात आलेले आहेत.
रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदारांकडून या QR Code चे स्कॅनिंग करण्यात येते. यामुळे संबंधित परिसरात नियमित व प्रभावी पोलीस गस्त होत असल्याची खात्री होते तसेच रात्रीच्या वेळेत त्या परिसरावर विशेष लक्ष ठेवले जाते.
या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांना मदतीची आवश्यकता भासल्यास तात्काळ प्रतिसाद देता येतो, तसेच कोणतीही संशयास्पद अथवा गैरप्रकाराची घटना घडू नये यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
“मिशन गस्त” मुळे गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होत आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा आढावा मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी हे वेळोवेळी घेत आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा “मिशन गस्त” हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक प्रभावी, तंत्रज्ञानाधारित व लोकाभिमुख पाऊल ठरत असून, सुरक्षित रत्नागिरी घडविण्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.



