केंद्रस्तरीय इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेत आंगवली शाळेचा विद्यार्थी सोहम जाधव याने पटकावला द्वितीय क्रमांक

देवरूख दि. १ :- संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेत आंगवली येथील जि. प. प्राथमिक शाळेचा इयत्ता ४ थीचा विद्यार्थी सोहम निलेश जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सोहम हा पत्रकार निलेश जाधव यांचा सुपूत्र आहे. हुशार असणाऱ्या सोहमने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील मारळ येथील जि. प. आदर्श केंद्रशाळेत केंद्रस्तरीय इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत मारळ, आंगवली, बामणोली, कासारकोळवण, आंगवली रेवाळेवाडी, निवधे, मारळ धनगरवाडी, बोंड्ये या ८ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द लिहून घेण्यात आले, विद्यार्थ्यांना ठराविक शब्द घालण्यात आले, विद्यार्थ्यांकडून काही शब्द विचारून घेतले, अक्षरे मागेपुढे घेवून अर्थपूर्ण शब्द तयार करून घेतले. अशा चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेवेळी मारळ केंद्रप्रमुख नरेश सावंत, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बामणोली शाळेच्या शिक्षिका संचिता सुर्वे यांनी मेहनत घेतली तर केंद्रातील शिक्षकांचे बहुमोल सहकार्य लाभले.



