रत्नागिरी

बालगायिका ऋचा घांग्रेकर सोबत गप्पा, गाण्यांमधून युनायटेड गुरुकुलात वसंत पंचमी साजरी!

संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ):- प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण हा आत्मा असलेल्या युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागात माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी आगळ्यावेगळ्या व्यक्ती परिचय कार्यक्रमातून साजरी करण्यात आली. सा रे ग म प लिटिल चॅम्प या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या कार्यक्रमातून लहान वयातच आपल्या सुरेल गाण्याने लोकप्रियता मिळवलेल्या भिवंडी येथील राहणाऱ्या कु.ऋचा अभय घांग्रेकर हिने प.ए.सोसायटी, चिपळूण संचालित युनायटेड हायस्कूल च्या गुरुकुल विभागातील आपल्या प्रसन्न उत्साही आणि आत्मविश्वासपूर्वक उपस्थितीने संस्मरणीय केली.

गाणी,गप्पा आणि गोष्टी असं स्वरुप असलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात आणि ऋचाचे स्वागत गुरुकुल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या सामूहिक गीताने झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध सर यांनी ऋचा व तिचे वडील प्रसिद्ध कीर्तनकार अभय बुवा घांग्रेकर यांचे शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन स्वागत केले.

गुरुकुलातील गीतमंच आणि संगीत उपक्रमात नियमित सहभागी असणाऱ्या सात मुला मुलींनी ऋचाला प्रश्न विचारत तिची अनौपचारिक मुलाखत घेतली. ऋचाने मुलाखती मधून तिचा सांगीतिक प्रवास, गाण्याची आवड, पालकांचे सहकार्य, शाळेतील अभ्यास आणि गाणं यांचा समतोल, कीर्तनाची आवड अशा वेगवेगळ्या मुद्द्यांसंबंधी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच स्वतःच्या गाण्याचे सारे श्रेय आई वडिलांची पुण्याई आणि दत्त महाराजांची कृपा यालाच असल्याचे नम्रपणे नमूद केले. मुलाखतीनंतर अवचिता परिमळू,प्रभुरामाने दर्शन द्यावे,अशी भक्तिगीते आणि इंद्रधनुष्याचे सात रंग आणि ‘ वहिनी आल्यापासून दादा किती बदलला बाई’ अशी बहारदार बालगीते ऋचाने सादर केली. ऋचाच्या गाण्यांना तीचे मार्गदर्शक गुरु ओंकार लेले यांनी संवादिनी साथ केली.परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य सुनील जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गुरुकुलातील पाचवी ते नववी मधील सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button