रत्नागिरी

रत्नागिरी पोलीस दलामार्फत सायबर फसवणूक (डिजिटल अरेस्ट) करणाऱ्या एकास अटक

रत्नागिरी दि. २७ :- तब्बल सव्वा कोटीची सायबर फसवणूक (डिजिटल अरेस्ट) करणाऱ्या एकास रत्नागिरी पोलीस दलामार्फत अटक करण्यात आली आहे.

गुन्हयातील आरोपी याने तो बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सी.बी.आय अधिकारी, असल्याचे भासवून यातील फिर्यादी यांना त्यांचे कॅनरा बँक, माटुंगा, मुंबई येथील खात्यामधून 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची भीती घालून व त्यासाठी त्यांना डिजीटल अरेस्ट केले असल्याचे सांगून फिर्यादी यांचे कडून दिनांक 04/11/2025 ते 19/01/2026 रोजी दरम्यान वेळोवेळी पैशांची मागणी करून फिर्यादी यांची एकूण ₹1,23,00,000/- (एक कोटी तेवीस लाख) रुपयांची फसवणूक केली होती.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर नंबर (दापोली पोलीस ठाणे) 07/2026 भा. न्या. सं. 2023 चे कलम 318 (2), 318 (4), 319 (2), 3 (5) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासकामी फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी निष्पन्न झाल्याने सायबर पोलीस ठाणे रत्नागिरी येथील तपास पथक मुंबई व ठाणे येथे पाठवून तेथे स्थानिक बातमीदार तयार करून त्या आधारे मुंबई येथून एक आरोपीत यास दिनांक 23/01/2026 रोजी ताब्यात घेण्यात आले व त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर ठेवून त्याची 04 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

गुन्ह्याचे तपास व आरोपीस अटक करण्याकरिता पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे कडील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, पो. हवा/1040 संदीप नाईक, पो.कॉ/739 सौरभ कदम, पो.कॉ/74 रोहन कदम, पो.कॉ/327 निलेश शेलार यांनी वरील प्रमाणे कामगिरी केली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी करत आहे.

रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, “कोणीही पोलीस अगर सी.बी.आय अधिकारी / नॅशनल सिक्युरिटी विभाग / इतर विभागातून बोलत आहोत असे सांगून तुमचे बँक अकाऊंट / सिम-कार्डचा गैरवापर झाला असून त्याकरिता तुमची चौकशी करावयाची असल्याचे सांगून तुमची वैयक्तिक व बँकांची आर्थिक माहिती मागत असेल. तसेच अकाऊंट व्हेरीफिकेशन करीता पैसे ट्रान्सफर करा असे सांगत असेल, तर अशा कॉल वर विश्वास ठेवू नका.”

आपली वैयक्तिक / बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका व अशा धमक्यांना बळी पडू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button