फणसोप येथे डीजीके कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या शिबिराची सांगता

रत्नागिरी दि. ३: – नॉट मी, बट यू (मी नव्हे, तुम्ही) हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून समाजसेवेचा वसा जपणाऱ्या भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर फणसोप गावात उत्साहात झाले.

स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, बंधारे निर्मिती, विविध श्रमसंस्कार उपक्रमांद्वारे फणसोप गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले. सांगता कार्यक्रमाला मंचावर भारत शिक्षण मंडळाच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा नमिता कीर, फणसोपच्या सरपंच सौ. राधिका साळवी, जि. प. केंद्रीय शाळा फणसोपचे मुख्याध्यापक वसंत विश्वासराव, ग्रामसेवक सदानंद शिंदे, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथिला वाडेकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रा. ऋतुजा भोवड व प्रा. विनय कलमकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते न राहता समाजाशी नाळ जोडली पाहिजे, असे मत प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी व्यक्त केले. प्रा. मिथिला वाडेकर यांनी शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला. स्वयंसेवकांनी अनुभव कथनातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्वयंसेवकांचा सत्कार
शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला. यात उत्कृष्ट स्वयंसेवक दिगंबर माचिवले, स्मित पिलणकर, लक्षवेधी स्वयंसेवक रुद्र हरम, उत्कृष्ट नेतृत्व आर्यन वेलणकर, उत्कृष्ट उपक्रम पथनाट्य दीप गट, उत्कृष्ट व्यवस्थापन सुदर्शन गट, वृक्षवल्ली गटाला उत्कृष्ट गट पुरस्कार देण्यात आला. सूत्रसंचालन सहा. प्रा. स्मार्था कीर यांनी केले.



