रत्नागिरी

जानशी येथे आज १७  जानेवारीला संगीत नाटक “मत्स्यगंधा” सादर होणार

१९३६ पासून संगीत नाटकाची परंपरा जपणारे श्री देव गोपाळकृष्ण नाट्य मंडळ; गेल्या ४६ वर्षांपासून अखंड नाट्यप्रयोगांचे सातत्य

जैतापूर दि. १७ :- श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ, जानशी ही संस्था सन १९३६ मध्ये स्थापन झाली असून, स्थापनेपासूनच संगीत नाटकाची समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य सातत्याने करत आहे. प्रारंभीच्या काळात संगीत नाटकाच्या माध्यमातून गाव व परिसरात सांस्कृतिक चळवळ उभी करणाऱ्या या संस्थेने काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा नाट्यपरंपरेला नवसंजीवनी दिली असून मागील सलग ४६ वर्षांपासून या रंगमंचावर नियमितपणे संगीत नाट्यप्रयोग सादर केले जात आहेत. या कालावधीत संस्थेच्या माध्यमातून अनेक दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होऊन रसिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून यंदा संस्थेच्या वतीने भव्य नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, कै. वसंत कानेटकर लिखित आणि श्री. प्रकाश परांजपे दिग्दर्शित दोन अंकी संगीत नाटक “मत्स्यगंधा” सादर करण्यात येणार आहे. हा नाट्यप्रयोग शनिवार, दिनांक १७ जानेवारी  रोजी रात्री १० वाजता श्री देव गोपाळकृष्ण रंगमंच, जानशी येथे होणार आहे.

या नाटकासाठी रंगवेशभूषा श्री. तारक कांबळी यांनी सांभाळली असून नेपथ्य, ध्वनी व प्रकाश योजना श्री. शरद कांबळी (रेवंडी मालवण) यांनी केली आहे. संगीत साथ श्री. विश्वास देवघर, श्री. प्रशांत जोशी व श्री. प्रणव देवघर यांनी दिली आहे. प्रकाश परांजपे, सागर जोशी, दिनेश वाडेकर, सुनील धनावडे, राजा तांबे, प्रणय टुकाराम, किमया सोहनी आणि सायली शिवलकर हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या नाट्यप्रयोगाची निर्मिती श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळ, जानशी यांनी केली आहे.

या प्रदीर्घ नाट्यपरंपरेला सातत्याने खंबीर पाठबळ देणारे कैलासवासी विश्वनाथ उर्फ विसू पटवर्धन यांचे योगदान संस्थेच्या इतिहासात अत्यंत मोलाचे आहे. नाट्यकला, कलाकार आणि संस्थेच्या पाठीशी ते सदैव भक्कमपणे उभे राहत आले. आज ते आपल्यात नसले तरी, त्यांच्या पश्चात प्रथमच सादर होणाऱ्या या नाट्यप्रयोगात त्यांचे स्मरण कलाकार, कार्यकर्ते आणि रसिकांच्या मनात कायम आहे, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

नाट्यकलेसोबतच श्री देव गोपाळकृष्ण नाट्य मंडळ, जानशी ही संस्था सामाजिक बांधिलकीही जपत आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, शेतकरी मेळावे, वृक्षारोपण यांसारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे संस्थेने गाव व परिसरात आदर्श निर्माण केला आहे. कला, संस्कृती आणि समाजसेवा यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या संस्थेच्या नाट्योत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button