रत्नागिरी

सोशल मीडियाची ताकद ठरली प्रभावी; जैतापूर आठवडा बाजारात सरपंचांचा थेट हस्तक्षेप

जैतापूर, दि. २९ : जैतापूर येथील आठवडा बाजारातील वाढती अव्यवस्था दूर करण्यासाठी सरपंच राजप्रसाद राऊत यांनी स्वतः बाजारात उपस्थित राहून पाहणी करत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच बाजार परिसरात फिरून त्यांनी दुकानांच्या मांडणीची पाहणी केली तसेच वाहन चालक व ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत काही बेशिस्त व्यापाऱ्यांना समज दिली.

जैतापूर आठवडा बाजारासाठी ग्रामपंचायतीकडून दुकानदारांना पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही काही व्यापारी रस्त्यालगत दुकाने लावत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे ग्राहक व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन सरपंच राजप्रसाद राऊत यांनी संबंधित व्यापाऱ्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या.

यापूर्वीही जैतापूर आठवडा बाजाराचे योग्य नियोजन व्हावे यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडिओची दखल घेत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने परिसराची साफसफाई करून दुकानदारांसाठी लाईन आऊट करण्यात आली होती. त्यानंतर काही आठवडे शिस्त राखली गेली; मात्र पुन्हा काही व्यापाऱ्यांकडून बेशिस्तपणा सुरू झाल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पुन्हा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासनाने विषय गांभीर्याने घेत संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या तसेच कारवाईचा इशारा देण्यात आला. दरम्यान, जैतापूरचे ग्रामदैवत श्रीदेवी वेताळ पालखी मार्गावरही काही व्यापाऱ्यांनी दुकाने लावल्याने सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाचे म्हणजे, सरपंच राजप्रसाद राऊत आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांचे समर्थन करत समाज माध्यमातून काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने सकारात्मक बदल घडू शकतो, याचे हे उदाहरण ठरले आहे.

दरम्यान, सरपंचांनी स्वतः बाजारात उपस्थित राहून दुकानदारांना समजावून सांगत ग्राहक व वाहनचालकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले. बाजार अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button