रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा, नाविन्यपूर्ण उपक्रम – “मिशन परिपूर्ती”

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिक केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या उद्देशाने अनेक विशेष मिशन, प्रोजेक्ट व डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरु केले आहेत. या उपक्रमांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास दृढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे.

बऱ्याच वेळेला नागरिक कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, मदतीसाठी किंवा समस्या निवारणासाठी किंवा पोलीस मदत मिळवण्यासाठी डायल 112 या प्रणालीवर कॉल करतात किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला कॉल केला जातो.

यामध्ये डायल 112 या प्रणाली अंतर्गत प्राप्त कॉल हे सेंट्रल सिस्टम कडे जाऊन नंतर पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे स्थित पोलीस नियंत्रण कक्ष येथे प्राप्त होऊन पुढे तिथून हे कॉल संबंधित पोलीस ठाणे कडे पाठवविले जातात व नंतर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी / अंमलदार त्या कॉलर पर्यंत पोहोचतात आणि या कॉलरच्या असलेल्या समस्या सोडवतात व आवश्यक मदत करतात.

मात्र, अशा वेळी संबंधित कॉलरला प्रत्यक्षात योग्य व आवश्यक पोलीस मदत मिळाली आहे की नाही, त्यांची समस्या पूर्णपणे सुटली आहे की नाही, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना थेट माहिती मिळणे शक्य होत नाही. हीच बाब मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी लक्षात घेऊन रत्नागिरी पोलीस दलामार्फत डायल 112 कॉलरच्या मदतीची खात्री व अभिप्रायासाठी हा नाविन्यपूर्ण व विशेष लोकाभिमुख उपक्रम “मिशन परिपूर्ती” दिनांक 29/08/2025 रोजी पासून राबविण्यात येत आहे.

याकरिता याचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच सर्व कॉल करणाऱ्या व्यक्तींचा अभिप्राय घेण्यासाठी “मिशन परिपूर्ती” अंतर्गत एक विशेष सेल तयार करण्यात आलेले असून या “मिशन परिपूर्ती” सेल मार्फत आत्तापर्यंत 2,782 कॉलर्स यांचा अभिप्राय घेण्यात आलेला आहे. (जसे डायल 112 च्या कॉल झाल्यानंतर आपल्या समस्येचे निराकरण झाले किंवा नाही?, आपल्याला योग्य व आवश्यक पोलीस मदत मिळाली अथवा नाही?).

हे समर्पित “मिशन परिपूर्ती” सेल नियंत्रण कक्ष, रत्नागिरी येथे स्थित असून या सेलमार्फत सातत्याने डायल 112 च्या कॉलरचा पाठपुरावा केला जातो व डायल 112 आलेल्या कॉलर पर्यंत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार पोहोचल्यानंतर थोड्या वेळेने तक्रारदार कॉलरला मदत अथवा त्यांच्या समस्येचे निराकरण झाले अथवा नाही याबद्दल “मिशन परिपूर्ती” सेल कडून विचारणा केली जाते व त्यांचा अभिप्राय घेतला जातो व याच्या नोंदी एका स्वतंत्र रजिस्टर मध्ये केल्या जातात.

या नोंदींचे दररोज अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी व स्वतः मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे हे नियमित मॉनिटरिंग करतात व काही समस्या असल्यास पुन्हा या “मिशन परिपूर्ती” सेल मार्फत संबंधित कॉलरशी थेट संपर्क साधला जातो व त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाते तसेच कॉलरला आवश्यक मदत मिळाली की नाही, समस्या सुटली की नाही, वागणूक योग्य होती का, याबाबत अभिप्राय घेतला जातो.

“मिशन परिपूर्ती” सेल मार्फत आतापर्यंत 2,782 कॉलर यांच्या समस्यांचे 100% निराकरण करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी पोलीस दला तर्फे आवाहन करण्यात येते की, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असल्यास त्यांनी “मिशन परिपूर्ती” या सेवेचा लाभ घ्यावा तसेच डायल 112 वर कॉल केल्यानंतर “मिशन परिपूर्ती” सेलचे पोलीस अधिकारी / अंमलदार हे आपल्याला निश्चितपणे कॉल करतील व आपल्या समस्या व अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात याव्या जेणेकरून रत्नागिरी पोलीस दलाला आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करता येईल.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अथवा पोलीस मदतीसाठी डायल 112 या सेवेचा निःसंकोच वापर करावा. डायल 112 वर कॉल केल्यानंतर “मिशन परिपूर्ती” सेलचे पोलीस अधिकारी/अंमलदार आपल्याशी निश्चितपणे संपर्क साधतील, त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या व अभिप्राय स्पष्टपणे मांडावेत, जेणेकरुन पोलीस सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे सुधारता येईल.

तसेच “मिशन परिपूर्ती” या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण अथवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनास कळवावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button