रत्नागिरी

आता समारंभातील बुफे भोजनही चुलीवरचेच…….! 

कार्यालयातील समारंभ रद्द करण्याची वेळ

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर मिळणे बंद झाले असल्यामुळे आता कार्यालय चालवणाऱ्या व्यावसायीकांसमोर पूर्वी नोंदणी केलेले समारंभ देखील रद्द करण्याची वेळ आली आहे. याबरोबरच अगदी छोट्या समारंभात बुफे भोजनही चुलीवर करुन देण्याची वेळ येवून ठेपली आहे.

ज्या हॉटेल अथवा कार्यालय व्यावसायिकांकडे पूर्वी घेतलेले सिलेंडर होते, ते कसेबसे अगदी काटकसरीने वापरले तरीही संपले असल्यामुळे आता हॉटेल अथवा कार्यालय चालवायचे कसे , म्हणून हळूहळू एक एक करत हे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी येथील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात आज आयोजित चंद्रकांत केतकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या छोटेखानी समारंभात केवळ ३० माणसे असतानाही बुफे पद्धतीचे जेवण चुलीवरचे असल्याचा फलक जेवण पात्रांच्या जवळ व्यवस्थापना कडून लावण्यात आला होता. गॅसवरील आणि चुलीवरील भोजनाच्या स्वादात आणि गंधात थोडा फरक पडतो यासाठी अशा प्रकारचा फलक आम्हाला लावावा लागतो असे सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाने बोलताना सांगितले.

पुढील काही दिवसात जरी युद्ध थांबले तरी व्यावसायिक सिलेंडरचे वितरण लगेचच सुरु होणार नसल्यामुळे कार्यालय चालकांनी पुढील लग्न समारंभ नाईलाजाने रद्द करावे लागणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. गेल्या चार महिन्यापूर्वी ज्यांनी कार्यालयाची जेवणासह नोंदणी केली आहे, त्यांना काय उत्तर द्यायचे आणि सेवा तरी कशी द्यायची ?असा प्रश्न कार्यालय चालकांना पडला आहे.

ग्रामीण भागात कार्यालयातील जेवण चुलीवर

ग्रामीण भागातील लग्न समारंभाची नोंदणी देखील सध्या चार ते पाच महिने आधी केली जाते. ज्यांच्या विवाहाच्या नोंदण्या आम्ही यापूर्वीच घेतल्या आहेत त्यांना आता गॅस मिळत नसल्याचे कारण सांगून चालणार नाही. यासाठी आम्ही आमच्या शुभगंधा मंगल कार्यालयात चुलीवरचे जेवण देऊन आमची सेवा अविरत चालू ठेवणार आहोत.

— सुभाष पांचाळ, संचालक शुभगंधा मंगल कार्यालय लोवले, संगमेश्वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button