रत्नागिरी

चिपळूणच्या ऐतिहासिक परशुराम डोंगरावर भीषण वणवा; वनसंपदेचे मोठे नुकसान

चिपळूण दि. १५ :- ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या चिपळूण तालुक्यातील परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले. या आगीत डोंगराचा मोठा भाग कवेत घेतल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून, आगीच्या ज्वाळा आणि धूर दूरवरून स्पष्टपणे दिसून येत होता. या वणव्यामुळे परिसरातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली असून जैवविविधतेला मोठा तडा बसला आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच लागलेल्या या भीषण आगीत शेकडो लहान-मोठी झाडे, झाडीझुडपे आणि गवत पूर्णपणे जळून गेले आहे. यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा आली असून अनेक सरपटणारे प्राणी व पक्षी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. परशुराम डोंगरावर दरवर्षी वणवा लागण्याचे प्रकार घडत आहेत. मागील काही प्रसंगी वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळवले होते, मात्र बुधवारी लागलेला वणवा इतका रौद्र होता की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.

वारंवार लागणाऱ्या या वणव्यांमुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होत असल्याने निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा वणवा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. डोंगरावरील ही आग वेळीच रोखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष जमिनीवर ठोस पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button