रत्नागिरीसामाजिक

सहकार गौरव २०२५ पुरस्काराने स्वप्ना यादव सन्मानित

चिपळूण दि. १५ :- खेड जेसीआयतर्फे आयोजित जेसी सप्ताह कार्यक्रमात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना ‘जेसीआय सहकार गौरव २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे झालेल्या या सोहळ्यात विभागीय अध्यक्ष जेएफडी शाबा गावस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी झोन ११ माजी अध्यक्ष जेएफडी अतुल गोंदकर, रोटरी क्लब अध्यक्ष मंदार संसारे, लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अनिल सदरे, न्यानदीप चेअरमन अरविंद तोडकरी, रोटरी स्कूल चेअरमन बिपिन पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार क्षेत्रात कार्यरत राहताना सौ. स्वप्ना यादव यांनी महिला सक्षमीकरण, बचत गटांना प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक स्पर्धा अशा विविध उपक्रमांची जडणघडण केली आहे. सहकार क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊनच त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना सौ. यादव यांनी, “हा सन्मान सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील काम करण्याची प्रेरणा वाढवणारा आहे. सहकार चळवळ अधिक सक्षमतेने पुढे नेण्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहू,” असे सांगितले. या कार्यक्रमात जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी स्वागत केले. आपल्या मनोगतात त्यांनी, “जेसीआय खेड गेल्या ४३ वर्षांपासून सामाजिक व विविध क्षेत्रात सक्रिय असून आगामी काळात खेडवासीयांसाठी ‘जेसीआय फेस्टिवल’ नव्या जागेत आयोजित केला जाईल,” असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माजी विभागीय अध्यक्ष जेसीआय सेनेटर अमोल क्षिरसागर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button