
रत्नागिरी- महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि 4 दशकांची दीर्घ परंपरा असलेल्या कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवम संदीप जाधव (रानडे इन्स्टिट्यूट, पुणे), याने मोहोर उमटवली.
जिल्हास्तरीय कनिष्ठ गटामध्ये सोनाली मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक संपादन केला असून जिल्हास्तरीय इंग्रजी माध्यमिक गटामध्ये जान्हवी काशीराम देवघरे (संतोष मेहता स्कूल, दापोली) आणि मराठी माध्यमामध्ये तपस्या गुरुप्रसाद बोरकर (फाटक हायस्कूल,रत्नागिरी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्षीच्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषकावर लांजा वरिष्ठ महाविद्यालयाने नाव कोरले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचा सांघिक चषक अण्णासाहेब बेहेरे ज्युनिअर कॉलेज लवेलने पटकावला. यावेळी प्रमुख अतिथी दूरदर्शनचे माजी कार्यक्रमाधिकारी जयू भाटकर यांनी मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा नव्या विचारला आधार देणारी स्पर्धा असून अशा स्पर्धा आयुष्याला दिशा देणारा राजपथ असतात. या निमित्ताने आपण वक्तृत्वाचे राजदूत बनला आहात असे सांगितले.
कै. मृणाल हेगशेट्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा दरवर्षी एस एम जोशी विदयानिकेतन मध्ये आयोजित केल्या जातात. गेली 43 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत मोठा सहभाग असतो. यावर्षी शनिवार दिनांक 12 आणि 13 सप्टेंबर रोजी मोठ्या उदंड प्रतिसादात माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन अशा गटामध्ये स्पर्धा पार पडली. तब्बल 100हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मृणाल हेगशेट्ये स्मृती आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्या स्पर्धकांना जेष्ठ निवेदक दूरदर्शनचे माजी निर्माते जयू भाटकर, उद्योजक संतोष तावडे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ संजय गवाळी,मुख्याध्यापक उल्हास सप्रे, परीक्षक डॉ शंकर जाधव, नितेश रायकर, माधव अंकलगे, संतोष गार्डी, नेत्रा आपटे, अनुप्रिता कोकजे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेचे विजेते या प्रमाणे
माध्यमिक इंग्रजी माध्यम-
प्रथम क्रमांक जान्हवी काशीराम देवघरे (संतोष मेहता स्कूल, दापोली), द्वितीय क्रमांक – सृष्टी शांताराम कोकरे (नवनिर्माण हाय, रत्नागिरी), तृतीय क्रमांक -अर्चित अनिल पाटील (ज्ञानदीप विद्यामंदिर,बोरज ), उत्तेजनार्थ प्रथम -अफ्रा मुद्दसर डिंगणकर (नवनिर्माण हाय, रत्नागिरी) उत्तेजनार्थ द्वितीय -सत्यजित बाबासाहेब सनाप, (ज्ञानदीप विद्यामंदिर,बोरज)
माध्यमिक मराठी माध्यम-
प्रथम -तपस्या गुरुप्रसाद बोरकर (फाटक हायस्कूल,रत्नागिरी), द्वितीय- श्रेया कृष्णा मिस्त्री (न्यू इंग्लिश स्कूल देवरुख), तृतीय -पूर्वा विनायक (जोशी फाटक हायस्कूल,रत्नागिरी), उत्तेजनार्थ प्रथम -जुई उमेश गद्रे (जिंदाल हायस्कूल, जयगड), उत्तेजनार्थ द्वितीय- संस्कृती शांताराम कोकरे (नवनिर्माण हाय, रत्नागिरी),
जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय –
प्रथम – कावेरी राकेश चव्हाण (अण्णासाहेब बेहेरे ज्युनिअर कॉलेज लवेल, चिपळूण), द्वितीय- बिलवा गणेश रानडे (वि.स.गांगण कॉलेज, रत्नागिरी), तृतीय- उमा सुनील तावडे (आश्रम शाळा, निवे), उत्तेजनार्थ प्रथम -विधी सत्यजित कापडी (नवनिर्माण ज्युनियर कॉलेज रत्नागिरी), उत्तेजनार्थ द्वितीय- प्रतीक्षा अनिल कांबळे (अण्णासाहेब बेहेरे जुनिअर कॉलेज, लवेल)
राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट –
प्रथम- शिवम संदीप जाधव (रानडे इन्स्टिट्यूट, पुणे), द्वितीय- यश रवींद्र पाटील( मुंबई विद्यापीठ,मुंबई ), तृतीय- सानिया उदय यादव (लांजा महाविद्यालय ), उत्तेजनार्थ प्रथम- रमेश सुनील कचरे, (एस. पी. महाविद्यालय, पुणे), उत्तेजनार्थ द्वितीय -सोनाली मंगेश कदम (लांजा महाविद्यालय).
याप्रसंगी अनेक मान्यवारांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.1982 मध्ये मातृ मंदिराच्या प्रांगणात सुरू झालेली मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा आज अविरतपणे सुरू आहे. या स्पर्धेत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून विद्यार्थी सहभागी होतात याचवरून या स्पर्धेचा दर्जा लक्षात येतो. खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अशा वक्तृत्व स्पर्धेचे व्यासपीठ आयुष्याला दिशा देणारा राजपथ आहे. या राजपथाचा उपयोग विधायक गोष्टीसाठी करा. या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होऊन आपण खऱ्या अर्थाने राजदूत बनला आहात असे प्रतिपादन दूरदर्शनचे माजी कार्यक्रमाधिकारी जयू भाटकर यांनी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयु भाटकर यांनी अनेक उदाहरणे दिली. प्राचार्य शिवाजीराव भोसले, लेखक जयवंत दळवी यांची उदाहरणे देत श्रोता कसा आहे, त्याला काय आहे काय हवे आहे याचे भान वक्त्याने ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने चांगली व्याख्याने ऐकली पाहिजेत. त्यासाठी चांगले वाचन करणे गरजेचे आहे. वाचन हाच वक्तृत्वाचा पाया आहे. देशाचे जबाबदार नागरिक बनताना विधायक विचार संसदीय पद्धतीने मांडण्यासाठी घाबरू नका असे आवाहन जयू भाटकर यांनी यावेळी केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले की, मृणाल हेगशेट्ये स्पर्धेला मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून नवनिर्माणच्या टीमने एक मॉडेल तयार केले आहे. निर्भीड, ज्वलंत विषयांचे व्यासपीठ या निमित्ताने निर्माण झाले असून एक प्रकारची वैचारिक घुसळण आणि विचारांचा महोत्सव निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप यूनिवर्सिटीमध्ये अडकून न बसता ग्रंथालयात जाऊन संदर्भ शोधणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रंथालय जाण्याची चळवळ उभे करूया. यावेळी प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा सचिन टेकाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा अश्विनी कांबळे यांनी केले.



