
रत्नागिरी दि. २० :- खरंतर कालपर्यंत मी भाजपमध्ये होतो. पण कालच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजेश सावंत हे आता पार्टीचा भाग नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी भाजपात नसल्याने आता मुलीच्या प्रचारात उतरणार असल्याची स्पष्ट भूमिका राजेश सावंत यांनी आज येथे मांडली.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझी मुलगी शिवानी सावंत-माने हिला उभाठा पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्टी कुठेही अडचणीत येऊ नये म्हणून मी भाजपा दक्षिण विभागाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कडे दिला होता. त्यावेळी माझ्यामुळे पक्ष कुठेही अडचणीत येऊ नये यासाठी आपण ही भूमिका घेत असल्याचे माझे म्हणणे मी प्रदेशाध्यक्षांकडे मांडले होते. पार्टीचा कार्यकर्ता असल्याने मी माझ्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही मी गेलो नव्हतो.
मात्र काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत राजेश सावंत हे आता पार्टीचा भाग नसल्याचे सांगितले. कालपर्यंत पक्षाचा झेंडा माझ्या घरावर होता. आता मी पार्टीचा भाग नसल्याने आजच हा झेंडा मी उतरवला. आता मी पार्टीचा साधा कार्यकर्ताही नसल्याने मी आता माझ्या मुलीच्या प्रचारात उतरणार असल्याचे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्याचप्रमाणे राजेश सावंत हा सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहील. मी नाती जपणारा माणूस आहे. राजकारणापलीकडे जाऊन नात सांभाळतो, असेही राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.



