रत्नागिरी

खेरशेत टोलनाका अपघातमुक्त करण्यासाठी तातडीची कारवाई

सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी घेतला पुढाकार

चिपळूण दि. ४ :-  तालुक्यातील खेरशेत टोलनाका परिसरात बसविण्यात आलेले रस्ता दुभाजक स्पष्टपणे न दिसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत होता. परिणामी या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले होते. ही बाब सावर्डे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या वारंवार निदर्शनास येत होती.

या गंभीर समस्येची दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार आबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याकडे ही बाब ठोसपणे मांडली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी शहाबुद्दीन हे आपल्या पथकासह खेरशेत टोलनाका परिसरात दाखल झाले. प्रत्यक्ष पाहणी करून दुभाजक स्पष्टपणे दिसण्यासाठी दोन्ही बाजूंना रेडियम पट्टे, वळण दर्शविणारे सूचनाफलक तसेच टोलनाक्याच्या आधी काही अंतरावर मार्गदर्शक सूचना फलक बसविण्यात आले. या सर्व उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली.

या संपूर्ण कारवाईत सावर्डे पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. या उपायांमुळे महामार्गावरून वेगात येणारी वाहने थेट दुभाजकावर धडकण्याचे प्रकार थांबण्यास मोठी मदत होणार आहे.

या वेळी अनेक वाहनचालकांनी थांबून सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पथकाचे मनापासून आभार मानले. वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य अपघात टळले असून खेरशेत टोलनाका परिसर अधिक सुरक्षित झाला आहे, अशी भावना वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button