रत्नागिरी

दहा हजाराची लाच घेताना चाफे सजा येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

रत्नागिरी दि. २ : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी आणि फेरफार प्रत देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५९) असे कारवाई करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून, तो चाफे सजा येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत.

तक्रारदाराने मौजे आगरनरळ येथे १० गुंठे बिनशेती जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी खताद्वारे सातबारा उताऱ्यावर फेरफार करून स्वतःचे नाव लावण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी आणि सातबाराची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराने याप्रकरणी 3१९ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा ९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली असता, चव्हाण यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

एसीबीच्या पथकाने चाफे येथील कार्यालयात सापळा रचला. गुरुवारी (१ जानेवारी) तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बजरंग चव्हाण यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. जयगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस अंमलदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांच्या पथकाने केली. या कारवाईला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास, नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button