श्रीरंग जोगळेकरला हार्मोनियम वादनाचे राष्ट्रीय स्तरावर विशेष पारितोषिक

रत्नागिरी दि. २९ : रत्नागिरीचा उभरता युवा हार्मोनियमवादक श्रीरंग हेरंब जोगळेकर याला राष्ट्रीय स्तरावर स्वरवाद्य वादन या कलाप्रकारात राष्ट्रीय स्तरावर विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशदा, पुणे येथे हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय कला उत्सवात उल्लेखनीय यशाबद्दल श्रीरंगला सन्मानित करण्यात आले. कला उत्सवात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांकाची ३ आणि द्वितीय क्रमांकाचे १ आणि विशेष पारितोषिक ३ अशी ७ पारितोषिके पटकावून देदिप्यमान कामगिरी केली.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुण्यात यशदा येथे महोत्सव झाला. श्रीरंग जोगळेकर याने स्पर्धेमध्ये राग- पुरिया कल्याण सादर केला. पं. विश्वनाथ कान्हेरे आणि अनंत जोशी यांचा तो शिष्य आहे. युवा हार्मोनियम वादक श्रीरंग जोगळेकर बक्षीस वितरण समारंभप्रसंगी सतार, दिलरुबा, व्हायोलीन, तबला आणि हार्मोनियम असा विविध राज्यातील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना यशदा पुणे आणि बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सादरीकरण करण्याचा मान देण्यात आला.
राष्ट्रीय महोत्सवात महाराष्ट्राची कामगिरी अव्वल ठरली. यात समूह वादन, एकल गायन, दृश्यकला (3D), एकल वादन तालवाद्य, एकल वादन स्वरवाद्य, समूह नृत्य, पारंपरिक खेळणी बनवणे, पारंपरिक कथाकथन, नाटक, समूह गायन, एकल नृत्य, आणि दृश्यकला (2D) यामध्ये महाराष्ट्राला बक्षीसे मिळाली.
या स्पर्धेचे स्वरूप कॉलेज/शाळा स्तरावरील निवड, विभागीय स्तरावरील निवड, राज्य स्तरावरील निवड आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असे होते. अशा या ४ स्तरावरून संपूर्ण भारतातील निवड झालेल्या ९०० विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. स्पर्धेसाठी अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक, डाएटच्या अधिव्याख्याता दीपा सावंत, प्रसिद्ध तबला वादक वडिल हेरंब जोगळेकर व गायिका सौ. श्वेता, आणि संगीत मार्गदर्शक आनंद पाटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीरंगच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



