रत्नागिरी

जैतापूरचे सुपुत्र दानशूर उद्योगपती विलासराव (बाळूशेठ) मांजरेकर यांचे निधन

जैतापूर दि. २७ :- जैतापूरचे सुपुत्र, मुंबई येथील मे. सत्यसाई एक्स्पोर्टचे सर्वेसर्वा तसेच प्रसिद्ध दानशूर उद्योगपती आणि निस्सीम साईभक्त कै. श्री. विलासराव परशुराम मांजरेकर (वय ६६) यांचे शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाच वाजता मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जैतापूर, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. विलासराव मांजरेकर, ज्यांना बाळूशेठ या नावाने सर्वत्र ओळखले जात होते. हे साईबाबांचे निस्सीम भक्त होते. ते नियमितपणे शिर्डी येथे साईबाबांच्या सेवेसाठी जात असत. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांना ते नेहमीच भरभरून आर्थिक मदत करत. जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त तसेच जैतापूर एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईचे संचालक म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. अनेक साई मंदिरांसह जैतापूर येथील श्रीदेवी वेताळ मंदिराला त्यांनी कायम उदार हस्ते मदत केली.

हसतमुख स्वभाव, सर्वांशी आपुलकीने वागणारे, कोणाबद्दलही कधीही वाईट न बोलणारे आणि वाईट ऐकूनही न घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. मोठा मित्रपरिवार हेच त्यांच्या सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य होते.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन कन्या, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्त-मित्र परिवार आहे. आज सायंकाळी सात वाजता अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.

कै. विलासराव (बाळूशेठ) मांजरेकर यांच्या निधनाने समाजसेवा, उद्योग आणि साईभक्तीचा एक आदर्श अध्याय संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनी जैतापूर आणि मुंबई परिसर शोकमग्न झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button