पर्यावरणाच्यादृष्टीने घातक असणाऱ्या मिटेनी एस.पी.ए. या कंपनीस रत्नागिरीमध्ये येण्यास बंदी घालण्यात यावी
उबाठा पक्षाकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

रत्नागिरी दि. २६ :- पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असणाऱ्या मिटेनी एस.पी.ए. या कंपनीस रत्नागिरीमध्ये येण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी उबाठा पक्षाकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. रविंद्र भार्गव डोळस (जिन्हा समन्वयक), श्री. बळीराम जयराम गुजर, तालुकाप्रमुख चिपळूण, श्री. विजय दत्ताराम देसाई (उपतालुकाप्रमूख), श्री. अजित बबन गुजर (विभाग प्रमुख, चिपळूण), श्री. विनायक विजय वासकर, नयन दत्ताराम साळवी, शशिकांत नारायण बारगुडे, सचिन अशोक सावंतदेसाई आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात, इटली या देशामध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरी गेलेली मिटेनी एस.पी.ए. ही रासायनिक कंपनी सुरु होत असल्याचे माहिती समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम या ठिकाणी ही कपंनी सुरु होणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.
इटली सारख्या देशात ही कंपनी मानवी जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. या कंपनीच्या माध्यमातून फॉरेव्हर केमिकल्स म्हणून ओळखळी जाणारी ही रसायने तयार केली जात होती. रसायने निसर्गात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. या उत्पादनामुळे येथील सुमारे साडेतीन लाख नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याचे तपासात दिसून आले होते. त्यामुळे या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात कर्करोग, हार्मोनल विकार, वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून या देशाने या कंपनीवर बंदी घातली होती. असे असतानाही आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या लोटे पशुराम याठिकाणी ही कंपनी येत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिटेनी एस.पी.ए. या रासायनिक कंपनीची यंत्रसामुग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या विवा लाईफ सायन्सेस या उपकंपनीने खरेदी करून रत्नागिरी जिल्ह्यात लोटे येथे वापरात आणलेली आहे. या विषयीचा व्हिडीओ व्हायरल झाले असून वृत्तपत्रातून बातम्या ही प्रसिध्द झालेल्या आहेत.
जर एखाद्या देशाने या कंपनीवर बंदी घालून, दंड आकारला असतानाही आपल्या जिल्ह्यात ही कंपनी सुरु होणे अनाकलनीय आहे. कोकण हे निसर्गाच्या सानिध्यात अतिशय रम्य परिसर आहे. अशा निसर्गरम्य कोकणचा या रासायनिक प्रकल्पामुळे -हास होणार असेल तर आमचा या कंपनीला प्रचंड विरोध असून, आपण जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने सदर कंपनीला बंदी करावी. तसेच आपण यासाठी पुढाकार घेवून अशा अर्थाची कंपनी आली आहे का याचीही पताळणी करावी, अशी कंपनी आली असल्यास वा येवू इच्छित असल्यास त्यास पूर्णपणे प्रशासकीय पातळीवर विरोध करुन लोकांचे, शेती, पर्यावरणाचे हित जपावे, अशी मागणी केली आहे.



