रत्नागिरी

बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे कला-क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन

संगमेश्वर दि.१७ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था, मुंबई यांच्या वतीने बुरंबी (संगमेश्वर) येथील दादासाहेब सरफरे क्रीडा नगरीमध्ये दादासाहेब सरफरे कला-क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा १६ वा आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सव असून संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांचा मोठा सहभाग लाभणार आहे.

सन २००६ पासून जल्लोषमय वातावरणात साजरा होणाऱ्या या महोत्सवाचे यंदा १६ वे वर्ष आहे. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यासंकुलातील क्रीडांगणात हा महोत्सव संपन्न होणार असून खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच अशा मैदानी क्रीडा स्पर्धांसह विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

गुरुवार दि. १८ ते शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ या तीन दिवसीय सोहळ्याच्या पहिल्या दिवशी क्रीडा ज्योत व सहभागी खेळाडूंची लेझीम-झांज पथकासह देवी वाघजाई मंदिर, तेर्ये येथून दादासाहेब सरफरे क्रीडा नगरीकडे भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा नगरी व महोत्सवाचे उद्घाटन होईल. शनिवार दि. २० डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला गुणांना योग्य व्यासपीठ मिळणार असून क्रीडाप्रेमी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप रावजी मोरे, उपाध्यक्ष विक्रांत यशवंत जाधव, प्रताप नारायण देसाई, सरचिटणीस शरद बाईत, सचिव ललितकुमार लोटणकर, खजिनदार महेश जनार्दन जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, तसेच संस्थेचे संचालक, प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे व क्रीडा-कला-सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button