निवेंडी भगवतीनगर येथील माजी सरपंच बळवंत निवेंडकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन

रत्नागिरी दि. १ :- निवेंडी भगवतीनगर येथे राहणारे आदर्श शिक्षक आणि माजी सरपंच, स्वच्छ व परोपकारी स्वभावासाठी ओळखले जाणारे बळवंत निवेंडकर गुरुजी यांचे वृद्धापकाळाने आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी शिक्षण, ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी आणि गावातील ऐक्य यासाठी अविरत कार्य केले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या घडणीत त्यांनी आयुष्य समर्पित केले, तर सरपंच म्हणून गावाच्या प्रगतीत मोलाची भर घातली. स्वच्छ व शिस्तबद्ध कार्यपद्धती, लोकांशी साधे व प्रेमळ वागणे आणि समाजसेवेची अखंड ओढ ही त्यांची खरी ओळख होती.
गावातील सर्वच घटकांचे प्रश्न समजून घेत त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि गरजू यांच्याप्रती असलेली त्यांची जिव्हाळ्याची भावना आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
नातवाच लग्न 12 डिसेंबर ला मुंबईत होते आणि थोडी तब्बेत पण ठीक नसल्याने त्यांना मुंबईत नेण्यात आले होते. मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबई येथे स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.त्यांचे पश्चात दोन मुलगे सुना नातवंडे एक मुलगी, जावई, पुतणे पुतण्या असा मोठा परिवार आहे.



