तुळसुंदे येथील बापू जाधव यांचे निधन

जैतापूर दि. २५ (राजन लाड) :- गेल्या अनेक पिढ्यांना आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि निष्ठेनं मार्ग दाखवणारे कै. बापू बाबू जाधव (वय १०५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाले. त्यांच्या निधनाने तुळसुंदे व परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अत्यंत खडतर परिस्थितीतून संघर्षमय जीवन जगत त्यांनी आपल्या परिश्रमातून ओळख निर्माण केली. वाहतुकीची साधने अगदी नगण्य असताना, गाढवांवरून वेगवेगळ्या बांधकामांचे साहित्य विविध गावांमध्ये पोहोचविण्याचा व्यवसाय त्यांनी आयुष्यभर केला. त्यावेळी संपूर्ण जैतापूर–नाटे परिसरात तसेच राजापूर तालुक्यातील अनेक गावांत “बापू गाढव वाले” म्हणून ते परिचित होते. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि शब्दाला जागणारा स्वभाव यामुळे लोकांच्या मनात आजही त्यांच्याबद्दल अपार आदर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते तुळसुंदे, उगवती वाडी येथे वास्तव्यास होते. बापू मामा या नावाने सर्वजण ओळखत होते.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा विस्तृत परिवार आहे.
ज्यांच्या हातून अनेकांना रोजगार व मदत मिळाली, अशा या कष्टकऱ्यांच्या आठवणी गावकर्यांच्या मनात सदैव जिवंत राहतील.



