रत्नागिरी

राजापूर – कोळवणखडी येथे घरात घुसून लूटमारीचा प्रयत्न

राजापूर दि. २४ :- तालुक्यातील कोळवणखडी येथील सदानंद शांताराम मोरे (वय ५५) यांच्या घरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ६ दरोडेखोरांच्या टोळक्याने अंधाराचा फायदा घेत थेट घरात घुसून लूटमारीचा प्रयत्न केला. कोयता, धारदार हत्याराने मोरे कुटुंबाला धमकावत पैसे द्या नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली. अचानक घडलेल्या या घटनेने मोरे कुटुंब भांबावून गेले. रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सदानंद मोरे, त्यांची पत्नी व तीन मुली असे कुटुंब झोपेत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या मागच्या खिडकीतून दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि घरात मौल्यवान वस्तूंचा शोध घेत फिरू लागले. अचानक घरात अनोळखी ५ ते ६ जण घुसलेले पाहून मोरे कुटुंब जागे झाले. कुटुंबाने गोंधळ आरडाओरडा करतानाच दरोडेखोरांनी घरातीलच कोयता हातात घेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. ‘पोलिसांत गेलात तर संपवून टाकू,’ अशी धमकी दिली.

पैसे आणि दागिन्यांची मागणी दरोडेखोरांकडून करण्यात आली. घामाघूम झालेल्या मोरे कुटुंबाने तोंड बंद ठेवत जीव वाचवण्याच्या उद्देशाने घरात मुलींनी डब्यात बचत केलेली रक्कम काढून त्यांना दिली. यामध्ये १६०० रुपयांच्या आसपास रक्कम त्यांनी दरोडेखोरांच्या हातात ठेवली. दरोडेखोरांनी डोक्यावर कानटोप्या घातल्या होत्या, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. या घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री २ वाजता रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात नोंदवली.

मोरे कुटुंबातील ओरडण्याचा आवाजाने आजुबाजूचे गावकरी त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच हे टोळकं घाईघाईने अनुस्कुरा मार्गाने गाडीने पसार झाले. रात्रीचा अंधार आणि धूसर नंबर प्लेटमुळे गाडीचे नक्की ठिकाण अथवा वाहनाचा पुरावा अद्याप मिळालेला नसल्याचे कुटुंबाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button