रत्नागिरी

भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाचा उपक्रम

रत्नागिरी दि. २० :-  भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील करियर कट्टा विभाग आणि समाजशास्त्र विभागाने आयक्यूएसी (IQAC) च्या सहकार्याने विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाचा एक स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला.

दिनांक १८ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांत महाविद्यालयाच्या आवारामध्ये तसेच शहरातील बाजारपेठेमध्ये हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या निधी संकलनाची सुरुवात महाविद्यालयापासून करण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शेतकऱ्यांना सहाय्य म्हणून निधी दिला. विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करणे हा या उपक्रमामागचा उदेश्य होता.

या मानवतावादी उपक्रमात करियर कट्टा संसदेचे ११ विद्यार्थी आणि समाजशास्त्र विभागातील प्रथम वर्षातील ६ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे निधी संकलनाचे कार्य केले, तसेच समाजाला मदतीसाठी प्रोत्साहित केले. नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या या कार्याला भरभरून प्रतिसाद दिला. महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली, तसेच गरजूंच्या मदतीसाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. अशा पद्धतीने नागरिकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या निधी संकलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button